असं म्हणायचं असतं म्हणून नाही म्हणत काही. खरंच मला खूप वाईट वाटतंय तुम्हाला इतक्या दिवसांनी भेटतोय म्हणून. पण काय करणार मित्रांनो ? खूप काम असतं. शिवाय तुमची जशी शाळा सुरु झालीय ना तशीच आमच्या जयुरानीची आणि आदुदादाची शाळाही सुरु झालीय.
संध्याकाळी घरी आल्यानंतर तुम्ही अभ्यास करता ना. तसाच त्यांचाही अभ्यास सुरु असतो. मग मला काही कॉम्पुटरवर बसता येत नाही आणि तुमच्यासाठी नवीन काही लिहिता येत नाही.
पण तुमची आठवण येतच असते हं !
मला माहिती आहे शाळा संपली कि सुट्टी लागते. तुम्हाला खूप आनंद होतो. नुसत्या उनाडक्या करत फिरता तुम्ही. दोन महिने आई - बाबा, आज्जी - आजोबा, मामा - मामी साऱ्या साऱ्यांना नकोशे वाटत तुम्ही. कधी एकदा ही कार्टी शाळेत जातील आणि घर शांत होईल असं वाटत असतं त्यांना.
पण तुमचं मन कुठं कळतं त्यांना ? खरंतर तुम्हालाही सुट्टीचा कंटाळाच आलेला असतो. आणि तुम्हालाही कधी एकदा शाळा सुरु होते आणि कधी एकदा नवा गणवेष, नवी वह्या पुस्तक घेऊन शाळेत जातो आणि आपल्या मित्र - मैत्रिणींना सुटीतल्या गंमती जंमती सांगतो असं होऊन गेलेलं असतं.
झालं!!!!!!!!!!!!!
सुट्टी संपते. शाळा सुरु होते. पण महिन्या दोन महिन्यातच तुम्हाला पुन्हा शाळेचा कंटाळा येऊ लागतो. वाटतं, काय हे ? रोज तेच तेच. शाळा, शिकवणी, अभ्यास, इतिहास, भूगोल अगदी चक्रावून जाता तुम्ही.
अशाच तुमच्या एका मैत्रिणीलाही शाळेचा खूप खूप कंटाळा आलाय. तिला वाटत आपल्यापेक्षा देवाचं आयुष्य खूप मजेचं आहे. शाळा नाही, पाटी नाही, अभ्यास नाही, शिकवणी नाही कि संध्याकाळी शुभंकरोतीही म्हणायची नाही. ही सगळी शोकांतिका देवालाच सांगताना ती म्हणते -
देवबाप्पा, देवबाप्पा
बरं आपलं तुझं आहे
अभ्यासाचं पाठीवरती,
तुझ्या कुठं ओझं आहे.
वरच्या चित्रवरती टिचकी मारा. मग तुम्हाला ही कविता आणखी मोठ्ठी करून पहाता येईल.
कशी वाटली कविता ? ते न विसरता कळवा.
पण ही कविता म्हणजे आपली गंमत बरं. शाळेत जायला हवाच खरं.
नुसत शाळेत जाऊनही नाही भागायचं. अभ्यासही करायला हवा. कराल ना अभ्यास. सगळेच हो म्हणताय.
चला तर मग बाय.
तुम्ही खूप मन लावून अभ्यास केलात कि मग मीही तुम्हाला एक वचन देईन. चार आठ दिवसातून भेटण्याचं. तुमच्यासाठी काहीतरी लिहित राहण्याचं.