Sunday, June 27, 2010

एक होतं वांग



                  मला माहिती  आहे तुम्हाला वंग आवडत नाही. म्हणजे वांग्याची भाजी आवडत नाही. पण मुलांनो वांग्याची भाजी खरंच खूप छान लागते. फक्त भाजीवाल्याडून वांगी घेताना ती कशा घ्यावीत त्याचं एक गणित आहे. हिरव्या रंगाची, जांभळ्या रंगाची, आकारानं खूप मोठ्ठी वांगी घेवू नयेत. त्यात खूप बिया असतात. आणि चवीलाही ती काहीशी   मिळमिळीत लागतात.
                  वांगी घ्यावीत अंगावर निळसर झाक आणि पांढरे ठिपके असलेली. 
                  मुलांनो वांग्याची भाजी आपल्या जेवणात असणा आपल्या शरीरासाठीही खूप खूप आवश्यक आहे. कारण त्यातून आपल्याला पोट्याशिअम आणि रक्त वाढीसाठी आवश्यक असणारी आयर्न हे खनिजही मिळतं. तर ' बी ' आणि ' सी ' यासारखी जीवनसत्वही वांग्यात असतात. त्यात ज्यांच्यामुळे आपल्या शरीरात चरबी वाढते असे फ्याटही   नसतात.
                  इतकंच नव्हे तर ते आपल्या रक्त वाहिन्यात क्लोरेस्टोल जमा होऊ देत नाही. सहाजिकच आपल्या र्ह्दय विकरासारख्या रोग पासून दूर ठेवतं कॉन्सर सारख्या दुर्धर रोगाला दूर ठेवायलाही वांग मदत करतं.
                  या कवितेतलं वांग आपल्याविषयी तक्रार करत असलं तरी त्याला आपल्या पोटात जायला आणि आपल्याला ताकद द्यायला आवडता हं !  
                  तरी हे वांग गमतीनं काय म्हणत पहा –


एक होतं वांग                          
स्वतः मध्ये दंग
शेत सोडून निघालं
बाजार गेलं
भाजीवाल्यानं विकून
ते सुमाताईंना दिलं

सुमाताईंनी आणलं घरी
केल त्याचं भरीत
वांग म्हणालं, " पाहुणचाराची
ही काय रीत ? "

घरी आणून यांनी
भाजून काढलं मला
मीठ मिरची टाकून म्हणे,
" छान बेत झाला."



Tuesday, June 22, 2010

राक्षस गेला शाळेमध्ये

मुलांनो,

तुम्हाला माहिती आहे का कि काल आमच्या राक्षसपुरचा राक्षससुद्धा शाळेत गेला होता. खोटं नाही सांगत आहे. खरंच, अगदी देवाशप्पत.

कशाला म्हणून काय विचारताय ?           

तुम्ही कशाला जाता शाळेत ?

बरोबर ! शिकून मोठ्ठ व्हायला. हो कि नाही.

आमच्या राक्षसरावांना म्हणे बाराखडी आणि अंकलिपी शिकायची होती.

तुम्हाला वाटलं असेल एवढा मोठ्ठा धिप्पाड राक्षस शाळेत गेला म्हणजे शाळेचं दार तोडाव लागलं असेल. छप्पर काढव लागलं असेल. पण नाही हा मुलांनो तसं काही करावं लागलं नाही. ज्या दरवाजातून मुलं वर्गात गेली त्याच दरवाजातून राक्षसरावही वर्गात गेले. आतमध्ये जाताना इतके वाकले कि चक्क आजोबा झाले. वर्गात येवून उभं राहू गेले तर धाडदिशी छप्पर डोक्याला लागलं. बाकावर बसले असते तर, बाकाचा पार भुगा झाला असता. म्हणून त्यांनी चक्क जमिनीवरच बसकन मारली. ऐसपैस बसले.

गुरुजी वर्गात आले. त्यांची आपली नेहमीची नाकासमोर पहायची आणि बेंचवर बसलेय मुलांवरून नजर फिरवायची सवय. सहाजिकच त्यांचं समोर बसलेल्या राक्षसरावांकडे लक्षच गेलं नाही. मग राक्षसरावांनीच गुरुजींना शिकविण्या विषयी विनंती केली आणि काय गंमत झाली पहा -

एकदा एक राक्षस
शाळेमध्ये गेला
गुरुजींसमोर बसून म्हणाला
शिकवा आता मला


पुढची कविता खालच्या चित्रात संपूर्ण वाचा -

Sunday, June 20, 2010

आज ' बाबा दिन '


                               मला वाटत ' चिमणी दिन ', ' मातृदिन ' , पर्यावरण दिन असा करता करता माझ्याकडून या वर्षातल्या साऱ्याच दिवसांविषयी लिहून होणार आहे. विशेष म्हणजे यातला पर्यावरण दिन सोडला तर इतर कोणताही दिवस मला ज्ञात नव्हता. पण योगायोगाने हे सारे दिवस एकामागून एक माझ्या समोर येत गेले.                           
                                    चिमणी दिनाविषयी त्या दिवशीच्या मी सकाळी सकाळी वर्तमान पत्रात वाचलं. मातृदिनाविषयी असंच मला कुठून तरी कळलं. आणि  आज ' पितृदिन ' अर्थात ' फादर्स डे.' प्रत्येक जून महिन्यातला तिसरा रविवार हा   ' फादर्स डे ' म्हणून साजरा केला जातो. 
                                खरंतर मी स्वतःच एक बाप. पण तरीही सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत मला आजच्या या खास दिवसाची कोणतीही जाणीव नव्हती. पण संध्याकाळी आमच्या अक्कलरावीन बाई मला म्हणाल्या, " आहो, आज फादर्स डे आहे." मग आमच्या जयूराणीनं मला शुभेच्छा दिल्या. आणि मग मी माझ्या बाबांना डोळ्यासमोर ठेवून आजच्या या दिवसाविषयी लिहू लागलो. 
                               जन्मदात्यासाठी असलेल्या इंग्रजीतल्या कोणत्याही शब्दापेक्षा ' बाबा ' हि हाक अधिक जवळकीची वाटते. तुमच्यासाठी घर सोडून दिवसभर राबणारा बाबा, लाडानं तुम्हाला उंच आभाळात उंचावून पुन्हा झेलणारा बाबा, तुम्हाला खाऊ आणणारा बाबा, तुम्हाला रागवल्यानंतर तुम्ही रडू लागलात कि तुमचे डोळे पुसणारा बाबा, झोपेतल्या तुमच्या चेहऱ्याकडे पहाताना तुम्ही खुप खुप मोठ्ठे व्हाल अशी स्वप्नं पाहणारा बाबा.
                              मुलांनो आईला जसा कधी त्रास द्यायचा नाही तसंच बाबांनी तुमच्याविषयी पाहिलेल्या स्वप्नांची कायम जाणीव ठेवायची आणि खुप खुप मन लावून अभ्यास करायचा.......... मोठा व्हायचं............नाव कमवायचं.
                              मुलांनो जगातल्या कुठल्याही बाबाला काय पहायचं असतं आयुष्यात माहिती आहे ?..........नाही ना !
                              मी सांगतो, " जगातल्या कुठल्याही बाबाला.........त्याचं बाळ म्हणजे तुम्ही त्याच्याहीपेक्षा खुप मोठ्ठं झालेला पहायचं असतं."                      
                             आंब्याच्या झाडाच्या कोयीतून पुन्हा गोड आंबा देणारा झाडच उगवायला हवं कि नाही तसंच तुम्हीसुद्धा मोठ्ठं होऊन खुप गोड वागायला हवं.
                             हो कि नाही ?
                             सगळ्यांनाच माझा म्हणणं पटलेला दिसतंय. चला तर मग, बाबांपेक्षा खुप खुप मोठ्ठं व्हायचं असा निश्चय करा आणि बाबंची गोड पापी घेवून आजचा दिवस साजरा करा.
   

Saturday, June 19, 2010

पाटी तेवढी खरी वाटते

खरं तर तुमची शाळा सुरु व्हायच्या आधीच हे सारं लिहायचं होतं पण नाही वेळ मिळाला. मला माहिती आहे तुमची शाळा सुरु होऊन आता आठवडा झालाय. पण जे आधी लिहायचं होतं ते आत्ता लिहितो. म्हणतात ना, " एखादी  चांगली गोष्ट कधीच न करण्यापेक्षा उशिरा का होईना पण करावी.

ठीक आहे.

हा तर मग आता सांगा तुमच्या शाळेचा पहिला दिवस कसा गेला ?

मजेत गेला असेल ना ?

नवे कपडे..........नवे बूट. नवं दफ्तर.........नव्या वह्या...............नवी पुस्तकं. सारं सारं......नवं कोरं.

मुलांनो या नव्या वह्या पुस्तकांचा कधी वास घेऊन पाहिलात ?

पहिल्या पावसानंतर येणारा मातीचा वास आणि नव्या पुस्तकांचा वास दोन्हीही खूप छान असतात. ते तयार करता येत नाही. पण जेव्हा येतात तेव्हा श्वासात भरून घ्यावेसे वाटतात.

काही काही गोष्टी अती झाल्या कि त्यांचा कंटाळा येतो. सुट्टीचही तसंच असतं. मला माहिती आहे तुम्हालाही सुट्टीचा कंटाळा आला असेल. कारण या पुढच्या कवितेतल्या छोट्यालाही सुट्टीचा कंटाळा आलाय म्हणूनच तो म्हणतोय -   

आता झाली सुट्टी पुरे
शाळा मला खरी वाटते
टि. व्ही. नको गेम नको

पाटी तेवढी खरी वाटते

तो छोटू आणखी काय काय म्हणतोय ते ही पहा -

      

Monday, June 14, 2010

अक्कलरावांच्या जागतिक दौऱ्याचा अहवाल

मला माहिती आहे माझ्यावर रागावलेले नाही. कारण तुम्ही तुमच्या खेळण्यात दंग होतात. कुणी आत्याकडे.........कुणी मामाकडे.......कुणी काकाकडे असे वेगवेगळ्या गावी गेला होतात. तिथल्या पाहुणचारावर मस्त ताव मारत होतात. आत्याने, मामाने आणि काकांनी केलेल्या कौतुकात बुडून गेला होतात. मग कशाला तुम्हाला अक्कलरावांची आठवण होईल ? पण तुम्हाला माझी आठवण आली नाही म्हणून मला काही तुमचा राग नाही आला.       

उलट मला मात्र रोज तुमची आठवण होत होती. म्हणूनच मध्ये मी जगभर विमान प्रवास करण्यासाठी निघालो तेव्हा विमानात झालेल्या गंमती जंमती आणि एअर होस्टेस जवळ आम्ही व्यक्त केलेलं आमच्या जगभरच्या दौऱ्याच प्रयोजन आम्ही तुम्हाला विजयरावांच्या मार्फत मी तुम्हाला सांगितल. त्याच्या पुढची हि गंमत.

मुलांनो मी असं सारं जग फिरून आलो. पण आपल्या इथल्या मंत्रीमंडळांचे जागतिक दौरे जसे नेहमीच अयशस्वी ठरतात तसाच माझा जागतिक दौराही अयशस्वी ठरला.

मी जगभर फिरून आल्यानंतर माझ्या दौऱ्याचा एक अहवाल तयार केलाय. तो अहवाल पुढीलप्रमाणे -

" आपल्या इथले कावळे, " काव - काव " आणि चिमण्या, " चिव - चिव " याची जगाच्या दौर्यावर जाताना मी नोंद केली होती. आफ्रिकेत पोहोचल्यावर तिथल्या कावळ्यांच्या आणि चिमण्यांच्या आवाजाची नोंद करण्याचा मी प्रयत्न केला. पण तिथले कावळेही काव - कावच करतात आणि चिमण्याही चिव चिव करत त्यांना दाद देतात.   

मला वाटला होतं अमेरिकेतल्या कावळ्यांचा रंग आपल्या इथल्या कावळ्यांच्या तुलनेत असेल गोरा. अहो पण कसचं काय तिथल्या कावळ्यांपेक्षा आपल्या इथल्या कावळ्यांचाच रंग बरा.

खर तर मला जगभरच्या प्रवासात  ठिकठिकाणच्या  मिसळचा.......वडापावचा.........इडलीसांबरचा......स्वाद चाखायचा होता. पण छे ! सारं जग फिरून आल्या नंतर मला कळलं हे सारं फक्त आपल्या भारतातच मिळतं. काही ठिकाणी मिळतही असं काही पण त्याला आपल्या इथल्या सारखी चटकदार चव नाही. सहाजिकच माझी खूप उपासमार झाली. त्यामुळेच यापुढे कोणत्याही कारणासाठी प्रदेश दौरा करायचा नाही असं मी ठरवून टाकलंय. "
तुमचा ...........
अक्कलराव 

मित्रांनो आणखी एक गोष्ट अक्कलरावांनी तुम्हाला सांगितलीच नाही. ती मी सांगतो. अंटार्तिकात गेल्यावर अक्कलरावांना तिथली बर्फाची गाडी खूप आवडली. साहजिकच त्यांनी विमान तिथच सोडून दिलं आणि तिथल्या  बर्फाच्या गाडीत बसून ते परतीच्या प्रवासाला निघाले. पण विषवृत्त ओलांडताना त्यांची बर्फाची गाडी वितळून गेली आणि अक्कलरावांना मजल दरमजल करत पुढचा प्रवास करावा लागला.

अन्यथा आज अक्कलराव आपल्या पुण्यातल्या रस्त्यातून बर्फाच्या गाडीत बसून फिरताना आपल्याला दिसले असते.                    
.तुमचा ............
छे ! मी माझं नाव तुम्हाला सांगणार नाही. मी तुम्हाला हि अक्कलरावांची फजिती सांगितली हे अक्कलरावांना कळाल तर ते माझ्यावर रागवतील ना !                           

Saturday, June 5, 2010

५ जून. जागतिक पर्यावरण दिन.

मित्रांनो,                                                               
मागे एकदा मी " जागतिक चिमणी दिना " विषयी
लिहिला होतं.


आठवतोय तुम्हाला तो दिवस ?

बरोबर. २० मार्च.

तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं कि चिमण्यांसाठी आपण आपल्या अवती भोवती धान्य पेरायला हवं. त्यामुळे चिमण्यांची संख्या वाढेल. पण चिमण्या हा एक घटक आहे पर्यावरणाचा.

आपल्या बेताल वागण्यामुळे चिमण्या प्रमाणेच इतरही अनेक सजीव नामशेष होऊ लागले आहेत. हे सजीव कधीही आपल्यावर अवलंबून नव्हते. आपणच त्यांच्या आधारे जगत आलो. पहाता पहाता प्रगत झालोत. पण आपली प्रगतीच आपल्याला एक दिवस मारक ठरणार आहे. कारण आपली प्रगती साधता साधता आपण करतो आहोत निसर्गाचा विध्वंस. पण हे थांबायला हवं असं आता साऱ्या जगाला वाटू लागलाय. म्हणून सारं जग पर्यावरण सुदृढ व्हावं यासाठी एक दिवस साजरा करतं. तो दिवस म्हणजे आजचा दिवस -
५ जून. जागतिक पर्यावरण दिन.                              
                                   
वरच्या चित्रातली मुलं पहिलीत. झाड त्यांच्या कानात एक गोष्ट सांगतंय. ती गोष्ट मी तुम्हाला नंतर सांगिन.

आत्ताच हवी.

नाही रे बाळांनो. नंतर नक्की सांगिन.

हो हो मला माहिती आहे मी तुम्हाला मागे खूप वचनं दिली आहेत. तुम्हाला ते पावसाचं गाणं ऐकवायचं आहे. खूप गोष्टी सांगायच्या आहेत. पण थोडा धीर धरा. वेळ मिळेल तसं सारं सांगणार आहे.

 आज आपण फक्त जागतिक पर्यावरण दिनाविषयी बोलू.             

मित्रांनो आपण एवढी वृक्षतोड केली आहे कि काही दिवसांनी आपल्याला श्वास घेणंही अवघड होणार आहे.

झाड काय काय करतात माहिती आहे तुम्हाला ?

बरोबर ते आपल्याला ऑक्सिजन देतात. त्यालाच आपण प्राणवायू म्हणतो.

आणखी ?
अगदी बरोबर. ती आपल्याला सावली देतात, आपल्या घरासाठी लाकूड देतात, वय झाला कि स्वतःला चुली मध्ये जाळून घेतात.

पण या बरोबरच झाडा जेव्हा आपल्याला ऑक्सिजन देतात तेव्हा ती हवेतला कार्बनडाय ऑक्साइड हा वायू शोषून घेतात.  हा वायू ते त्यांच्या बुंध्यात साठवून ठेवतात. जेव्हा हा बुंधा जाळला जातो तेव्हा हा सारा कार्बनडाय ऑक्साइड पुन्हा हवेत मिसळला जातो. म्हणून झाड तोडू तर नयेच पण तोडल्यानंतर जाळू तर मुळीच नये.    

मित्रहो अक्कलराव झाडं लावायचं काम करतात. तुम्ही जाल का त्यांच्यासोबत ?

जाल म्हणताय. तुम्ही खरच खूप शहाणी मुलं आहात.

आणि नाही जमला तुम्हाला अक्कलरावांच्या बरोबर जायला तरी हरकत नाही. या पावसाळ्यात तुम्ही प्रत्येकानं एक झाड लावा. त्याला रोज पाणी घाला. त्याला छोटी छोटी तांबूस हिरवी पानं येतील ना मग पहा तुम्हाला किती छान वाटेल. ते झाड नव्हे तुमचंच इवलसं रूप वाटेल तुम्हाला.
तुम्ही एवढ केलंत ना कि मग आजचा दिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागल्यासारखा वाटेल मला.

तुमचा अक्कलराव 

Thursday, June 3, 2010

अक्कलरावांचा विमानप्रवास

मित्रांनो,
अक्कलरावांच्या खूप गमती जमती तुम्हाला इथं पाहायला, वाचायला मिळतील. अक्कलरावांच्या धमाल गोष्टीही वाचता येतील. कारण स्वर्गातले नारदमुनी आणि भूतलावरचे अक्कलराव दोघांची कुंडली एकंच. दोघांनाही  कोणत्याही लोकी कधीही प्रवेश घेता येतो. अक्कलराव असे केव्हाही, कुठेही प्रवेश करू शकत असल्यामुळे ते केव्हाही कुठेही जातात आणि मजा करतात. ते स्वर्गात जातात, समुद्रात जातात, पऱ्यांच्या प्रदेशात जातात, राक्षसाच्या गुहेत शिरतात आणि धमाल करतात.
अगदी परवाचाच उदाहरण घ्या ना. तुम्हाला सुट्टी लागली म्हणून तुम्ही गावो गावी निघून घेलात. कुणी नुस्ते खेळण्यात रमले. सगळे विसरले अक्कलरावांना. साहजिकच अक्कलरावांनाही कंटाळा आला. मग तेही निघाले फिरायला. पण कुठे जायचं फिरायला ?

विचार करता करता अक्कलरावांनी चक्क जगभर फिरून यायचं ठरवलं. आता जगभर फिरायचं म्हणल्यावर बैलगाडीतून प्रवास करून थोडंच चालणार आहे. सहाजिकच अक्कलरावांनी विमानान प्रवास करायचं ठरवलं. मग अक्कलरावांनी पासपोर्ट काढला, व्हिसा काढला. आणि एक दिवस आपलं चंबू गबाळ घेवून पोहचले विमानतळावर.

थोड्याच वेळात त्यांचं विमान प्ल्याट फॉर्मला लागलं. रेल्वेच्या नाही काही विमानाच्या प्ल्याट फॉर्मला. हो बरोबर सांगितलत तुम्ही " धावपट्टी " म्हणतात त्या प्ल्याट फॉर्मला.

झालं अक्कल राव विमानात बसले. विमानाचं दार लागलं. सूऊऊउ करून विमान हवेत झेपावलं.
अक्कलराव त्यांच्या खुर्चीत रेलले. विमानाच्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहू लागले. एवढ्यात एअर होस्टेस आली आणि मग काय काय गंमत झाली पहा बरं. अक्कलरावांना जगभर कशासाठी फिरायचं आहे तेही अक्कलराव एअर होस्टेसला सांगतात.ते ही फरा मजेशीर आहे. हे सारा वाचा या कवितेत -