Sunday, December 12, 2010

आय अम अ डिस्को डान्सर

मला माहिती आहे मी खूप दिवसांनी भेटतो आहे तुम्हाला. पण भेटतो तर आहे ना ? विसरलो तर नाही ना ? एवढ्या दिवसानंतर भेटताना मी एक छान गण आणला आहे तुमच्यासाठी. पण हे गण माझा नाही बरा का !!!!! तुमच्यासारख्याच एका छोट्या मित्रांना मला दिलेली ती भेट आहे. तुम्हाला आवडली तर सांगा.   

माझं गाव ओढ्या वघळीतलं. पावसाळ्यात तुडूंब भरून वाहणारं.............उन्हाळ्यात डोहाडोहातून साचणार.
वस्तीवरची शाळा चवथीपर्यंत. त्यापुढं शिकायचं असेल तर कमीत कमी तीन किलोमीटर चालत जायला हवं आणि शाळा सुटल्यानंतर पुन्हा तेवढच चालत यायला हवं. उन्हाळ्यात पायात चपला असतीलच याची खात्री  नाहीच पण हिवाळ्यात स्वेटरही मिळणार नाही. उन्हाळ्यात फुफाट्यातले चटके सोसत आणि हिवाळ्यात थंडीत कुडकुडत शाळेत जायला हवं. असाच कधीकाळी मी तिथल्या शाळेत गेलो आहे.

त्यामुळंच गावी गेल्यानंतर अनवाणी पायपीट करत शाळेत जाणारी एवढी एवढीशी मुलं मुली पहिली कि ' सर्व शिक्षा अभियान ' च्या जाहिरातीतल्या ' स्कूल चले हम .......... ' असं म्हणत आनंदानं बागडणाऱ्या मुलांच चित्रं माझ्या  डोळ्यासमोर उभं रहातं ..........आणि शहरातली दारादरात येणाऱ्या स्कूल बसमध्ये बसून शाळेत जाणारी तुम्ही मुलं किती नशीबवान असं वाटू लागतं.

असो!!!!!!!

तर परवा दिवाळीच्या सुट्टीत मी गावी गेलो होतो. सोबत भाऊही होता. त्याची दोन आणि माझी दोन मुलं, आई असे सारे सोबत.

संध्याकाळी शेतातून वस्तीवरच्या घराकडे जायला निघालो. माझे दोन तीन चुलत भाऊ रानातच घर बांधून शेताच्या कडेलाच रहातात. माझी आई चुलतभावाच्या छोट्या मुलाला म्हणाली, " तात्या, चल रे आमच्या सोबत. रहा आजची रात्र आमच्या बरोबर. सकाळी उठून येऊ परत रानात. "

तो तिसरीतला पोरगा. अश्या तश्या कपड्यातला ( म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलाचे असतात तसे कपडे हं ), डोक्याचा चमन केलेला. निघाला आमच्या सोबत. पायात पायताणही नाही माझ्या नव्याकोऱ्या गाडीत्नच घरी जायचं होतं. त्याला त्याचंही अप्रूप .

आम्ही घरी पोहोचलो.

रात्री गच्च काळोखातही मिणमिणणारा माझं गाव. अंगणात अंथरून टाकून आभाळाखाली चांदण्यात न्हात आम्ही निवांत बसलेलो. मुलांची दंगा मस्ती चाललेली. माझ्या आणि भावाच्या बायकोचा आत चुलीवर स्वयंपाक चाललेला. आई आमच्यातच बसलेली. सुखाला कुरवाळत. ती म्हणाली, " तात्याला छान गाणी येतात हं.  "

मी तर शब्दांचा दास. आईचा शब्द उचलून धरत मीही त्याला आग्रह केला.

झालं !!!!! लगेच ते पोरगं गाणं म्हणू लागल. ते मला इतकं आवडल कि मी लगेच ते माझ्या मोबाईलवर रेकोर्ड करून घेतलं. ते गाणं तुमच्या समोर मांडावस वाटलं. म्हणून हा सारा उपद्व्याप.

तुम्ही शहरातली पोरं ' हम्पी .......डम्पि ' शिकता ........आणि गावाकडची पोरं ..........!!!!!!!!!!
कोकणात बारा मैलांवर भाषा बदलते असं म्हणतात. शिक्षणसुद्धा असंच गावागणिक बदलत असावं असं मला वाटलं. हे सारं राहू द्या. ते गाणं तर पहा............

Sunday, August 22, 2010

देवबाप्पा, देवबाप्पा

सॉरी !

असं म्हणायचं असतं म्हणून नाही म्हणत काही. खरंच मला खूप वाईट वाटतंय तुम्हाला इतक्या दिवसांनी भेटतोय म्हणून. पण काय करणार मित्रांनो ? खूप काम असतं. शिवाय तुमची जशी शाळा सुरु झालीय ना तशीच आमच्या जयुरानीची आणि आदुदादाची शाळाही सुरु झालीय.

संध्याकाळी घरी आल्यानंतर तुम्ही अभ्यास करता ना. तसाच त्यांचाही अभ्यास सुरु असतो. मग मला काही कॉम्पुटरवर बसता येत नाही आणि तुमच्यासाठी नवीन काही लिहिता येत नाही.

पण तुमची आठवण येतच असते हं !
मला माहिती आहे शाळा संपली कि सुट्टी लागते. तुम्हाला खूप आनंद होतो. नुसत्या उनाडक्या करत फिरता तुम्ही. दोन महिने आई - बाबा, आज्जी - आजोबा, मामा - मामी साऱ्या साऱ्यांना नकोशे वाटत तुम्ही. कधी एकदा ही कार्टी शाळेत जातील आणि घर शांत होईल असं वाटत असतं त्यांना.

पण तुमचं मन कुठं कळतं त्यांना ? खरंतर तुम्हालाही सुट्टीचा कंटाळाच आलेला असतो. आणि तुम्हालाही कधी एकदा शाळा सुरु होते आणि कधी एकदा नवा गणवेष, नवी वह्या पुस्तक घेऊन शाळेत जातो आणि आपल्या मित्र - मैत्रिणींना सुटीतल्या गंमती जंमती सांगतो असं होऊन गेलेलं असतं.

झालं!!!!!!!!!!!!!

सुट्टी संपते. शाळा सुरु होते. पण महिन्या दोन महिन्यातच तुम्हाला पुन्हा शाळेचा कंटाळा येऊ लागतो. वाटतं, काय हे ? रोज तेच तेच. शाळा, शिकवणी, अभ्यास, इतिहास, भूगोल अगदी चक्रावून जाता तुम्ही.
अशाच तुमच्या एका मैत्रिणीलाही शाळेचा खूप खूप कंटाळा आलाय. तिला वाटत आपल्यापेक्षा देवाचं आयुष्य खूप मजेचं आहे. शाळा नाही, पाटी नाही, अभ्यास नाही, शिकवणी नाही कि संध्याकाळी शुभंकरोतीही म्हणायची नाही. ही सगळी शोकांतिका देवालाच सांगताना ती म्हणते -

देवबाप्पा, देवबाप्पा
बरं आपलं तुझं आहे
अभ्यासाचं पाठीवरती,
तुझ्या कुठं ओझं आहे.

वरच्या चित्रवरती टिचकी मारा. मग तुम्हाला ही कविता आणखी मोठ्ठी करून पहाता येईल.

कशी वाटली कविता ? ते न विसरता कळवा.

पण ही कविता म्हणजे आपली गंमत बरं. शाळेत जायला हवाच खरं.  

नुसत शाळेत जाऊनही नाही भागायचं. अभ्यासही करायला हवा. कराल ना अभ्यास. सगळेच हो म्हणताय.

चला तर मग बाय.

तुम्ही खूप मन लावून अभ्यास केलात कि मग मीही तुम्हाला एक वचन देईन. चार आठ दिवसातून भेटण्याचं. तुमच्यासाठी काहीतरी लिहित राहण्याचं.
 

Sunday, August 1, 2010

मैत्री दिन अर्थात फ्रेन्डशिप डे

महिना होऊन गेला मी तुम्हाला भेटलेलो नाही. त्यामुळं तुम्ही माझ्यावर खूप खूप रागावलेला असाल याची मला जाणीव आहे. अक्कलराव भेटले कि त्यांचा चांगला कान धरायचा......... ओढायचा.......... पिळायचा........ अगदी लालबुंद करून सोडायचा अस तुम्ही मनाशी अगदी ठरवून टाकलेलं असेल. पण नाही, असं रागवायचं नाही. मी तुमच्यासाठी लिहितो पण तुम्ही मात्र माझा ब्लॉग वरचेवर वाचत नाही. तुम्हाला ब्लॉग आवडला कि नाही ते मला कळवत नाही म्हणून मी रागावलोय का कधी तुमच्यावर ? मैत्रीत नसतच रागवायचं एकमेकांवर.

गुरुजींनी, अभ्यास का नाही केला ? असं विचारलं तर तुम्ही बऱ्याचदा अनेक कारणं सांगता कधी खरी..........कधी खोटी. पण मी नाही तुम्हाला अशी काही कारणं सांगत बसणार. मी खूप दिवसानंतर तुम्हाला भेटतो आहे. आणि तुम्हाला भेटण्यासाठी मी खूप खूप उशीर केला म्हणून तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे.

अगदी आजही तुम्हाला भेटणं शक्य नव्हतं. पण आज मैत्री दिवस. आणि तुम्ही माझे जीवाभावाचे मित्र मग तुम्हाला भेटल्याशिवाय आणि गोड गोड शुभेछा दिल्याशिवाय मला झोप कशी येईल ?
जाता जाता आपल्या मैत्रीसाठी या ओळी -
तुमचा
अक्कलराव 

Tuesday, July 6, 2010

एक होता पाऊस


तुमची शाळा सुरु झालीय. अभ्यास मागे लागलाय. चाचणी परीक्षा जवळ आलीय. या सार्याची मला जाणीव आहे. म्हणूनच अलीकडे तुमच्या साठी लिहाना थोडा कमी केल्या. पण बंद नाही हा केल्या. आणि तुमच्यासाठी लिहिणं मी बंद तरी कसा करू शकेन. मलाच मुळात तुम्हाला भेटल्या शिवाय करमत नाही.
एका गोष्टीचा मात्र मला फ्हार फ्हार वाईट वाटत. मी तुमच्यासाठी अगदी मनापासून लिहायचा प्रयत्न करतोय पण तुमच्या प्रतिक्रिया मात्र मला वाचायला मिळत नाहीत. त्यामुळं सहाजिकच तुम्हाला माझा ब्लोग किती आवडतोय ते कळत नाही.
आता पावसाला सुरु झालाय. पाऊस येतो. आपल्याला चिंब करतो. मातीला भिजवतो. काय जादू असते या पावसात काही कळत नाही. पण मातीला हिरवा रंग चढतो. पक्षांचे मंजुळ आवाज येवू लागतात. दूर दूर डोंगराच्या कुशीत फिरून यावंसं वाटतं.
तुम्ही परवा माझ्या ‘ एक होतं वांग ’ या कवितेतल्या वांग्याची गंमत वाचली असेल. तसाच हा पाऊसही.
तुम्ही लपाछपी खेळताना तुमच्या मित्रांसोबत. तसाच हा पाऊसही त्याच्या तुमच्या सारख्याच काही मित्रांसोबत लपाछपी खेळतोय. लपाछपी खेळता ल्ख्र्लता तो लपायला  चक्क डोंराच्या पलीकडे गेलाय. आणि डोंगराआड लपून बसलाय.
मग तुमचा मित्र त्याला शोधत डोंगराच्या पलीकडे गेला. त्यांना पावसाला एक जोरदार धप्प दिला. आणि मग काय गंमत झाली ती पहा या कवितेत –

एक होता पाऊस
त्याला बरसण्याची हौस
रिमझिमत याचा
मला कुशीत घ्यायचा.

लपाछपी खेळताना
डोंगराआड लपायचा
वीज होवून डोंगरा आडून 
मला लपून पहायचा

मी त्याला शोधत मग
डोंगरदरयात जायचो
त्याच्या हळूच जावून
जोरात धप्पा  दयायचो

मग तो पुन्हा एकदा
सर होवून यायचा    
गोड गोड गार गर
खिसा भरून दयायचा
 
मी मग त्याला एक 
गोड पापा दयायचो  
त्याचा हातात हात घालून
खुशाल पाऊस व्हायचो

Sunday, June 27, 2010

एक होतं वांग



                  मला माहिती  आहे तुम्हाला वंग आवडत नाही. म्हणजे वांग्याची भाजी आवडत नाही. पण मुलांनो वांग्याची भाजी खरंच खूप छान लागते. फक्त भाजीवाल्याडून वांगी घेताना ती कशा घ्यावीत त्याचं एक गणित आहे. हिरव्या रंगाची, जांभळ्या रंगाची, आकारानं खूप मोठ्ठी वांगी घेवू नयेत. त्यात खूप बिया असतात. आणि चवीलाही ती काहीशी   मिळमिळीत लागतात.
                  वांगी घ्यावीत अंगावर निळसर झाक आणि पांढरे ठिपके असलेली. 
                  मुलांनो वांग्याची भाजी आपल्या जेवणात असणा आपल्या शरीरासाठीही खूप खूप आवश्यक आहे. कारण त्यातून आपल्याला पोट्याशिअम आणि रक्त वाढीसाठी आवश्यक असणारी आयर्न हे खनिजही मिळतं. तर ' बी ' आणि ' सी ' यासारखी जीवनसत्वही वांग्यात असतात. त्यात ज्यांच्यामुळे आपल्या शरीरात चरबी वाढते असे फ्याटही   नसतात.
                  इतकंच नव्हे तर ते आपल्या रक्त वाहिन्यात क्लोरेस्टोल जमा होऊ देत नाही. सहाजिकच आपल्या र्ह्दय विकरासारख्या रोग पासून दूर ठेवतं कॉन्सर सारख्या दुर्धर रोगाला दूर ठेवायलाही वांग मदत करतं.
                  या कवितेतलं वांग आपल्याविषयी तक्रार करत असलं तरी त्याला आपल्या पोटात जायला आणि आपल्याला ताकद द्यायला आवडता हं !  
                  तरी हे वांग गमतीनं काय म्हणत पहा –


एक होतं वांग                          
स्वतः मध्ये दंग
शेत सोडून निघालं
बाजार गेलं
भाजीवाल्यानं विकून
ते सुमाताईंना दिलं

सुमाताईंनी आणलं घरी
केल त्याचं भरीत
वांग म्हणालं, " पाहुणचाराची
ही काय रीत ? "

घरी आणून यांनी
भाजून काढलं मला
मीठ मिरची टाकून म्हणे,
" छान बेत झाला."



Tuesday, June 22, 2010

राक्षस गेला शाळेमध्ये

मुलांनो,

तुम्हाला माहिती आहे का कि काल आमच्या राक्षसपुरचा राक्षससुद्धा शाळेत गेला होता. खोटं नाही सांगत आहे. खरंच, अगदी देवाशप्पत.

कशाला म्हणून काय विचारताय ?           

तुम्ही कशाला जाता शाळेत ?

बरोबर ! शिकून मोठ्ठ व्हायला. हो कि नाही.

आमच्या राक्षसरावांना म्हणे बाराखडी आणि अंकलिपी शिकायची होती.

तुम्हाला वाटलं असेल एवढा मोठ्ठा धिप्पाड राक्षस शाळेत गेला म्हणजे शाळेचं दार तोडाव लागलं असेल. छप्पर काढव लागलं असेल. पण नाही हा मुलांनो तसं काही करावं लागलं नाही. ज्या दरवाजातून मुलं वर्गात गेली त्याच दरवाजातून राक्षसरावही वर्गात गेले. आतमध्ये जाताना इतके वाकले कि चक्क आजोबा झाले. वर्गात येवून उभं राहू गेले तर धाडदिशी छप्पर डोक्याला लागलं. बाकावर बसले असते तर, बाकाचा पार भुगा झाला असता. म्हणून त्यांनी चक्क जमिनीवरच बसकन मारली. ऐसपैस बसले.

गुरुजी वर्गात आले. त्यांची आपली नेहमीची नाकासमोर पहायची आणि बेंचवर बसलेय मुलांवरून नजर फिरवायची सवय. सहाजिकच त्यांचं समोर बसलेल्या राक्षसरावांकडे लक्षच गेलं नाही. मग राक्षसरावांनीच गुरुजींना शिकविण्या विषयी विनंती केली आणि काय गंमत झाली पहा -

एकदा एक राक्षस
शाळेमध्ये गेला
गुरुजींसमोर बसून म्हणाला
शिकवा आता मला


पुढची कविता खालच्या चित्रात संपूर्ण वाचा -

Sunday, June 20, 2010

आज ' बाबा दिन '


                               मला वाटत ' चिमणी दिन ', ' मातृदिन ' , पर्यावरण दिन असा करता करता माझ्याकडून या वर्षातल्या साऱ्याच दिवसांविषयी लिहून होणार आहे. विशेष म्हणजे यातला पर्यावरण दिन सोडला तर इतर कोणताही दिवस मला ज्ञात नव्हता. पण योगायोगाने हे सारे दिवस एकामागून एक माझ्या समोर येत गेले.                           
                                    चिमणी दिनाविषयी त्या दिवशीच्या मी सकाळी सकाळी वर्तमान पत्रात वाचलं. मातृदिनाविषयी असंच मला कुठून तरी कळलं. आणि  आज ' पितृदिन ' अर्थात ' फादर्स डे.' प्रत्येक जून महिन्यातला तिसरा रविवार हा   ' फादर्स डे ' म्हणून साजरा केला जातो. 
                                खरंतर मी स्वतःच एक बाप. पण तरीही सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत मला आजच्या या खास दिवसाची कोणतीही जाणीव नव्हती. पण संध्याकाळी आमच्या अक्कलरावीन बाई मला म्हणाल्या, " आहो, आज फादर्स डे आहे." मग आमच्या जयूराणीनं मला शुभेच्छा दिल्या. आणि मग मी माझ्या बाबांना डोळ्यासमोर ठेवून आजच्या या दिवसाविषयी लिहू लागलो. 
                               जन्मदात्यासाठी असलेल्या इंग्रजीतल्या कोणत्याही शब्दापेक्षा ' बाबा ' हि हाक अधिक जवळकीची वाटते. तुमच्यासाठी घर सोडून दिवसभर राबणारा बाबा, लाडानं तुम्हाला उंच आभाळात उंचावून पुन्हा झेलणारा बाबा, तुम्हाला खाऊ आणणारा बाबा, तुम्हाला रागवल्यानंतर तुम्ही रडू लागलात कि तुमचे डोळे पुसणारा बाबा, झोपेतल्या तुमच्या चेहऱ्याकडे पहाताना तुम्ही खुप खुप मोठ्ठे व्हाल अशी स्वप्नं पाहणारा बाबा.
                              मुलांनो आईला जसा कधी त्रास द्यायचा नाही तसंच बाबांनी तुमच्याविषयी पाहिलेल्या स्वप्नांची कायम जाणीव ठेवायची आणि खुप खुप मन लावून अभ्यास करायचा.......... मोठा व्हायचं............नाव कमवायचं.
                              मुलांनो जगातल्या कुठल्याही बाबाला काय पहायचं असतं आयुष्यात माहिती आहे ?..........नाही ना !
                              मी सांगतो, " जगातल्या कुठल्याही बाबाला.........त्याचं बाळ म्हणजे तुम्ही त्याच्याहीपेक्षा खुप मोठ्ठं झालेला पहायचं असतं."                      
                             आंब्याच्या झाडाच्या कोयीतून पुन्हा गोड आंबा देणारा झाडच उगवायला हवं कि नाही तसंच तुम्हीसुद्धा मोठ्ठं होऊन खुप गोड वागायला हवं.
                             हो कि नाही ?
                             सगळ्यांनाच माझा म्हणणं पटलेला दिसतंय. चला तर मग, बाबांपेक्षा खुप खुप मोठ्ठं व्हायचं असा निश्चय करा आणि बाबंची गोड पापी घेवून आजचा दिवस साजरा करा.