Sunday, June 20, 2010

आज ' बाबा दिन '


                               मला वाटत ' चिमणी दिन ', ' मातृदिन ' , पर्यावरण दिन असा करता करता माझ्याकडून या वर्षातल्या साऱ्याच दिवसांविषयी लिहून होणार आहे. विशेष म्हणजे यातला पर्यावरण दिन सोडला तर इतर कोणताही दिवस मला ज्ञात नव्हता. पण योगायोगाने हे सारे दिवस एकामागून एक माझ्या समोर येत गेले.                           
                                    चिमणी दिनाविषयी त्या दिवशीच्या मी सकाळी सकाळी वर्तमान पत्रात वाचलं. मातृदिनाविषयी असंच मला कुठून तरी कळलं. आणि  आज ' पितृदिन ' अर्थात ' फादर्स डे.' प्रत्येक जून महिन्यातला तिसरा रविवार हा   ' फादर्स डे ' म्हणून साजरा केला जातो. 
                                खरंतर मी स्वतःच एक बाप. पण तरीही सकाळपासून अगदी संध्याकाळपर्यंत मला आजच्या या खास दिवसाची कोणतीही जाणीव नव्हती. पण संध्याकाळी आमच्या अक्कलरावीन बाई मला म्हणाल्या, " आहो, आज फादर्स डे आहे." मग आमच्या जयूराणीनं मला शुभेच्छा दिल्या. आणि मग मी माझ्या बाबांना डोळ्यासमोर ठेवून आजच्या या दिवसाविषयी लिहू लागलो. 
                               जन्मदात्यासाठी असलेल्या इंग्रजीतल्या कोणत्याही शब्दापेक्षा ' बाबा ' हि हाक अधिक जवळकीची वाटते. तुमच्यासाठी घर सोडून दिवसभर राबणारा बाबा, लाडानं तुम्हाला उंच आभाळात उंचावून पुन्हा झेलणारा बाबा, तुम्हाला खाऊ आणणारा बाबा, तुम्हाला रागवल्यानंतर तुम्ही रडू लागलात कि तुमचे डोळे पुसणारा बाबा, झोपेतल्या तुमच्या चेहऱ्याकडे पहाताना तुम्ही खुप खुप मोठ्ठे व्हाल अशी स्वप्नं पाहणारा बाबा.
                              मुलांनो आईला जसा कधी त्रास द्यायचा नाही तसंच बाबांनी तुमच्याविषयी पाहिलेल्या स्वप्नांची कायम जाणीव ठेवायची आणि खुप खुप मन लावून अभ्यास करायचा.......... मोठा व्हायचं............नाव कमवायचं.
                              मुलांनो जगातल्या कुठल्याही बाबाला काय पहायचं असतं आयुष्यात माहिती आहे ?..........नाही ना !
                              मी सांगतो, " जगातल्या कुठल्याही बाबाला.........त्याचं बाळ म्हणजे तुम्ही त्याच्याहीपेक्षा खुप मोठ्ठं झालेला पहायचं असतं."                      
                             आंब्याच्या झाडाच्या कोयीतून पुन्हा गोड आंबा देणारा झाडच उगवायला हवं कि नाही तसंच तुम्हीसुद्धा मोठ्ठं होऊन खुप गोड वागायला हवं.
                             हो कि नाही ?
                             सगळ्यांनाच माझा म्हणणं पटलेला दिसतंय. चला तर मग, बाबांपेक्षा खुप खुप मोठ्ठं व्हायचं असा निश्चय करा आणि बाबंची गोड पापी घेवून आजचा दिवस साजरा करा.
   

No comments: