Tuesday, March 23, 2010

पावसा रे पावसा


चिंकी - पिंकी, छोट्या - गोट्या , लाडी - गोडी , सोनू -मोनू , कसे आहात सगळे ?

तुम्ही म्हणाल ,”काय हे अक्कलराव ? नेहेमी म्हणतात तुमच्या परीक्षा झाल्याशिवाय तुम्हाला भेटणार नाही . पण कसलं काय ?चार दिवसात हे आपले पुन्हा हजार .”


हो ! असं होतंय खरं माझं. काय करणार मित्रानो, तुमच्याशिवाय मला करमतच नाही. आपली पिलं झोपेत असताना बाबानं उठून ऑफिसला जाव, संध्याकाळी थकून घरी यावं आणि आपल्या पिलांना पहातच हुश SSSSश म्हणत खुष व्हावं. तसाच काहिसं होतयं माझं . तुम्हाला भेटल्याशिवाय करमतच नाही।

झालं काय कि खूप दिवस तुम्हाला एक गाणं ऐकवाव असं माझ्या मनात होतं. गाणं आहे तुमच्या सारख्याच एका छोट्या मुलाचं. या छोट्याला शाळेत जायचं नाही. पण आईला कारण काय सांगायचं ? पोटात दुखतंय म्हणून सांगाव तर ' भोलानाथ, भोलानाथ ' या गाण्यातला पोटात दुखतय असं आईला सांगणारा छोटू तिला माहिती आहे ।

मग काय करावं ? मग या गाण्यातल्या या छोट्याला एक मस्त आयडिया सुचते . तो पावसाला सांगतो," तू एकदा गुरुजी होऊन माझ्या शाळेत ये. आणि आख्खी शाळाच तुझ्या पाण्यात वाहून जावू दे.शाळा वाहून गेली कि मी तुला माझ्या घरी नेईन. गरम भजी आणि शिरा खायला देईन. मी तुला गरम भजी आणि शिरा दिला कि तू मला खिसा भरून तुझ्या गार गारा दे " अशी आणखी खूप धमाल आहे त्या गाण्यात. तर असं हे गाणं मला तुम्हाला ऐकवायच होतं.

पण ते गाणं होतं एका डी व्ही डी नावाच्या एका बंद कुलपाच्या पेटीत. ती पेटी उघडून तुम्हाला द्यायचं असलेलं नेमकं गाणं मला बाहेर काढायचं होतं . पण त्या कुलपाला एकहि चावी लागेना.खूप धडपडलो. पण काहीच करता येत नव्हतं. शेवटी आमच्या जयुरानीन एक चावी शोधून काढली. तुम्हाला द्यायचं असलेलं गाणही आम्ही त्या पेटीतून बाहेर काढलं. पण तरी हि ते गाणही मला इथ तुमच्यासाठी पाठवता येत नाही. खूप अडचणी आहेत.


मी जयुरानी म्हणालो असलो तरी तो खरा राजाच आहे हं . जयुरानी हे आमचा लाडाच आणि खाजगीतल नाव .


असो . लवकरच मी तुम्हाला तेव गाणं पाठवीनच. तूर्तास फक्त त्या गाण्याचे शब्द पाठवतोय
.

कस वाटलय गाणं ? लवकरच मी याची ओडियो तरी पाठवीन . तोपर्यंत .......

............बाय ......... बाय .

Sunday, March 21, 2010

चिमणी दिन २० मार्च

काल चिमणी दिवस होता.
तुम्ही म्हणाल ,” हा काय नवीन प्रकार आहे ?”

तुम्हाला बालदिन, महिला दिन, असे काही दिवस


जागतिक स्तरावर साजरे केले जातात हे माहित 

असेलच. तसाच -


चिमणी दिनही. २० मार्च

हा तो दिवस.
 
दोस्तांनो जगभर चिमण्यांची संख्या कमी होत आहे. पूर्वी,” एक घास चिउचा, एक घास काऊचा.” अस म्हणत आई आपल्या बाळाला घास भरवावची.

" चिमणीच घर होतं मेणाचं आणि कावळ्याचं घर होतं शेणाचं." ही गोष्ट तर आम्हाला तोंङपाठ होती. पण आता चिमणीला घरंट करायला जागाच उरली नाही तर ती घरंट कुठं बांधणार ?

" चिमणी चिमणी पाणी दे, कावळ्या कावळ्या खोपा दे." अस आम्ही पूर्वी वाळूचा खोपा करताना म्हणायचो. पण आता चिउताईला हाक कशी मारावी ? कारण ती आपल्या अवती भवती कुठेच दिसत नाही. अगदी परवाची गोष्ट सांगतो. आमच्या सोसायटित माझ्या एका मित्राने सोसायटितल्या रिकाम्या जमीनीत ज्वारी पेरली. हळू हळू हिरवे अंकुर वर आले. ज्वारिची धाट माझ्या खांद्याहुनही उंच झाली. त्यांना कणसं लागली. एक दिवस सकाळी सकाळी तिथं गेलो. पाहिलं तर त्या कणसांवर काही चिमण्या दाणे टिपत होत्या. पण त्या साऱ्या मिळून चौघीही नव्हत्या.

रानात राखन करताना हाळी दिली की शे – दोनशे चिमण्यांचा थवा भुर्रऽऽऽकन उडत जाताना मी पाहिला आहे. गेल्या कुठे येवढ्या चिमण्या ? आपण झाडं तोडली, पावसाचं प्रमाण कमी झालं.

पाखरांना घरट्याला जागा

आणि प्यायला पाणी मिळेनासं झालं.


मी मुळात खेडेगावातला. नगर जिल्हयात पिंपळगांवपिसा हे
माझा गांव. तिथं आमची शेती आहे. ला आठवतंय, पूर्वी आमच्या घरात शंभर सव्वाशे पोती ज्वारी यायची, पण आता जिकडे पहावं तिकडे ऊस, गहू हीच पिकं. शेतकरी म्हणतात," ज्वारीला त्रास फार. शिवाय राखण करावी लागते ती वेगळीच. नाहीतर पाखरं दाणा टिकू देत नाहीत. "
म्हणुन सरे ऊस करणार, गहू पेरणार. कारण मित्रांनो गव्हाच्या ओंबीवर छोटे छोटे कुसळ असतात. त्यामुळे चिमण्यांना त्या ओंबीतले दाणे खाता येत नाहीत. किती स्वार्थी नाही आपण ???????

आपल्या ह्या अशा अप्पलपोटी वागण्यामुळे चिमण्यांची संख्या दिवसें दिवस कमी होत चालली आहे. त्यांच संवर्धन कराव या हेतुने मनवाने वीस मार्च हा दिवस चिमनी दिन मानून साजरा

करायचा ठरवलंय.


पण मित्रांनो नुसता असा दिवस साजरा करून चिमण्यांची संख्या वाढणार नाही. त्यांची संख्या वाढायला हवी असेल तर आपल्याला झाडं लावली पाहिजेत. चिमण्यांना हवे असलेले दाणे सुध्दा

पेरले पाहिजेत.


"कुठे ?", म्हणून काय विचारता.

कुठेही!!!!!!

आपल्याला जागा मिळेल तिथे. अगदी आपल्या अंगणात सुध्दा. दाणे पेरले की, कणंस ये
तील. त्या कणंसावर चिमण्यां येउन बसतील. अगदी न सांगता. मग आपल्याला कधीही,

"या चिमण्यांनो परत फिरा घराकडे अपुल्या.’’

हे गाणं म्हणावं लागणार नाही.

Wednesday, March 17, 2010

मन्याचा टिफिन


मित्रांनो,

खरंतर काल सकाळीच तुमच्यासाठी लिहिलं होतं. त्यामुळे आता थेट तुमची परीक्षा संपल्यावरच तुम्हाला भेटणार होतो. पण काल दुपारी मंगेश तेंडुलकर यांच्या घरी गेलो होतो. मला माहित आहे. तुम्ही म्हणाल, "कोण हे मंगेश तेंडुलकर ? अक्कलरावांचे ते कोण लागतात ?"

मित्रांनो, अक्कलराव त्यांना देव मानतात. पण ख़रं तर ते फार मोठे व्यंगचित्रकार आहेत. तुम्ही म्हणाल,"व्यंगचित्रकार म्हणजे काय ?"
तुम्ही कार्टून पाहता की नाही टीव्हीवर ? टॉम अँड जेरी, शिनच्यान, डोरेमोन वैगेरे वैगेरे … … अरे वा ! ! ! ! सगळेच हो म्हणतात. हा तर त्यालाच म्हणतात व्यंगचित्र.
त्यांची अशी खुप व्यंगचित्र तुम्हाला पहायची असतील तर त्यांच्या -
http://www.mageshtendukar.com/
या वेबसाईटला भेट दया. तुम्हाला त्यांची अशी खुप व्यंगचित्र पहायला मिळतील.

त्यांच्या एका चित्रात एक ताई शाळेत निघाली आहे . तिने जेवणाचा डबा सोबत घेतला आहे . तुम्ही शाळेत जाताना जेवणाचा डबा सोबत नेता ना, तसाच. हो, हो, …… मला माहित आहे. तुम्ही जेवणाच्या डब्याला टिफिन म्हणता ते.
तर अशी ही ताई जेवणाचा डबा सोबत घेऊन शाळेत निघाली आहे . तिच्या सोबत तिची लाडकी मन्याही शाळेत निघाली आहे. मन्यालासुद्धा टिफिन हवाच ना ? म्हणुन तिनसुध्दा टिफिन सोबत घेतला आहे. पाहिलात ना तिच्या डब्यात काय खाऊ आहे तो ?

तुम्हालासुद्धा अशी व्यंगचित्र काढायला आवडतील ना ?

तर मग करा सुरु ............

कसं ? थोड शिकवायला हवं !!!!!!

छोट्या मित्रांनो, मंगेश तेंङुलकारांना कुणीही व्यंगचित्र काढायला शिकवलं नाही. त्यांच तेच शिकले.

कसं, म्हणून काय विचारता !!!!!

जिथं इच्छा असते............ तिथे मार्गहि असतो.

आलं ना लक्षात . तर मग करा सुरुवात.............!!!!!!!!!!

Monday, March 15, 2010

गुढी पाडवा


छोट्या मित्रांनो,
खुप दिवस झाले तुमच्याशी बोललोच नाही. सॉरी, वेळंच नाही मिळाला . पण आज पाडवा तुम्हाला गोड गाठी आणि पापा दयाला हवा ना! म्हणून आज वेळ काढलाच.
हं, तर मग आज काय आहे?
बरोबर, आज आहे पाडवा.
हे काय ? आत्ता कोण म्हणालं ,” पाडवा,पाडवा, नीट बोल गाढ़वा ?”
असं म्हणु नये. आज आपल्या हिंदू नव वर्षाचा पहिला दिवस. मग असं वाईट कशाला बोलायचं.?
"पाडवा,पाडवा नीट बोल गाढ़वा."

असं म्हणण्यापेक्षा -
"पाडवा, पाडवा, प्रेम वाढवा
अभ्यासाचं तोरण अभाळात ढवा"
असं म्हणालात तर किती छान वाटेल नाही !
छोट्या मित्रांनो मी तुम्हाला पुन्हा लवकरच भेटणार आहे. अक्कलरावांची आणि मन्याची गोष्ट घेवून. थोड़ी वाट पहा. आणि हो परीक्षा जवळ आल्या असतील नाही ? तेव्हा खुप खुप अभ्यास करा
तुम्हाला परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छाच्या!!!!!!!!!!!!!

Tuesday, March 9, 2010

अक्कलपुरचे अक्कलराव























मित्रांनो,
अक्क्लरावांची काहीशी झलक मी तुम्हाला परवाच्या अर्धवट कवितेतून दाखवली होती. आता ही अक्कलरावांवरची संपूर्ण कविता.
आणि हो अक्कलरावांवरची ही कविता तुम्हाला मोठ्ठी करून पहायची आहे ना.
मग तुमच्या पडद्यावर जो बाण दिसतो आहे ना, तो त्या फोटोवर न्या,
तुमच्या हातात जो उंदीर आहे ना त्याचा उजवा कान दाबा लगेच तुम्हाला अक्कल्ररावाचा हा फोटो मोठा दिसेल. हा फोटो तुम्हाला छापुनही घेता येईल.

अक्कलपुरचे अक्कलराव
छाती काढून खातात भाव
जर विचारला त्यांला नाव
लक्षात नाही म्हणतात राव

अक्कलराव शाळेत जातात
वर्गात खुशाल झोपा घेतात
मास्तरांच्या छड्या खाऊन
वरती पुन्हा ढेकर देतात

वर्गामधे अक्कलराव
सगळ्यात मागे बसतात
विनोद झाल्यानंतर ते
तासाभराने हसतात

झोपताना उशाला ते
सारी पुस्तके घेतात
उठ्ल्यावरती म्हणतात गेली
रात्र अभ्यासात

अक्कलराव म्हणतात त्यांचे
सगळे पाठ पाढे
डोळे झाकुनसुध्दा म्हणतात
वाचून दाखविन धङे

ताडमाङ उंच पेन
ते परीक्षेला नेतात
पेपर मात्र चक्क सारा
कोरा देऊन येतात

अक्कलराव तसे मुलानो
अककलेचेच राव
ओठावरती आणु नका
मुळीच त्यांचं नाव

खोटी मिजास बाळगु नका
करा मन लावून अभ्यास
तेव्हाच पहिल्या नंबराने
व्हाल तुम्ही पास

पण मुलांनो अक्कलराव दिसत असे असले तरी खरे ते तसे नाहीत बरं का. ते आहेत खुप हुशार. तुमची गंम्मत करायची म्हणून त्यानी हे सोंग घेतलय.
खरे अक्कलराव फार मजेशीर आहेत. ते राक्षसाच्या गुहेत जातात , विमानत बसतात, कागदाच्या होडीत बसून जगाची सफ़र करतात. त्यातल्या सगळ्या गंमतीजंमती तुम्हाला हळु हळु सांगणारंच आहे मी.........
मग भेटू या पुन्हा !!!!!!!!



Saturday, March 6, 2010

होळी रे होळी

















काय मित्रांनो,
कशी धमाल केलीत काल ? होळी पेटवताना तिच्यात तुम्ही गवऱ्या, लाकडं, एरंड्याची फांदी असं खुप काही टाकलं असेल. होळीच्या कुशीत ठेवलेल्या बारक्या काड्या, मुठभर गवत आधी पेटवलं असेल. मग हळु हळु होळी चहुअंगानं पेटली असेल. तिच्या भोवती गोल फिरत तुम्ही कंटाळा येईपर्यंत बोंब ठोकली असेल. आई बाबा रागवेपर्यंत टिमक्या वाजवल्या असतील.
होळी रे होळी पुरानाची पोळी
बामन मेला संध्याकाळी

असं म्हणत धमाल दंगा केला असेल. आमच्या लहानपणी आम्हीही असंच म्हणायचो. पठित धपाटे बसेपर्यंत दंगा करायचो. पण आता कळतंय हे काही बरं नाहीं. होळीच्या शुभ दिवशी आपण असं कुणाच मरण चिंताव हे काही खरं नाहीं. त्या पेक्षा आपण –
होळी रे होळी पुरानाची पोळी
होळी पेटली संध्याकाळी
होळी पेटली अशी झकास
तिला पाहता ठंडी पळाली

नैवेद्य होळीला पूरणपोळी


तिची राख लावु भाळी

पुढ्याच्या वर्षी पुन्हा येऊ दे

पुन्हा येऊ दे लवकर होळी
भारतीय सणांचा कोणताही दिवस कसा झकास असतो. वातावरण भारून जातं. सगळीकडे उत्साह पसरतो. घरातल्या बायकांपासुन पुरुषांपर्यंत सर्वांचीच लगबग सुरु असते. या सगळ्या धांदलित, “अभ्यासाला बस रे मेल्या” असं म्ह्नणत कोणी तुमचं बखोट धरत नाहीं. तेव्हा तर तुम्हाला वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस सन आणि उत्सव असावेत असा वाटंत. खरा की नाही ?
“नाही म्हणताय.”
“कसं शक्य आहे ? अरे आमच्या लहानपणी आम्हाला सुध्दा असंच वाटायचं. फक्त सन असावेत. रोज सुट्टी असावी. ” जसं आम्हाला वाटायचा तसं तुम्हालाही वाटणारचना. लहानपण असच असत. जसं आमचं तसाच तुमचंही."
आता कसे गालातल्या गालात हसलात ? पटला ना मी म्हणालो ते ? 
लिहिता लिहिता मधेच उठलो. खाली जाऊन सोसायटित पेटवलेल्या पेटवलेल्या होळीला नमस्कार केला. “ तुम्ही केलात ना नमस्कार होळीला ? ”
“केलात. बरं काय मागितलंत तिला ? ”

“अरे हे काय ! सारेच गप्प. काही मागितलंच नाहीत का तिला ? नुसता नमस्कारंच केलात का ?" “का नाहीं मागितल काही? तिच्या समोर ओंजळ करायचा अवकाश. ती तुम्हाला भरभरुन देईल.”
“ काय म्हणालात ? होळी काय देणार आपल्याला ? ते काय देव आहे का? ”
"होय! होळी ही देवताच आहे. अग्नि देवता. आपण होळी पेटवून तिची पूजा करतो ती एका अर्थी अग्निदेवतेचीच पूजा असते."
“काय? मी काय मागीतलत ?”
मी नमस्कार केला होळीला आणि तिला म्हणालो, “आई माझ्यात जे जे वाईट ते ते सारं तुझ्या ओटित घे अणि तुझं तेज मला दे"
आमच्या लहानपणी खुप मोठ्ठी होळी पेटावली जायची. इतकी की चार चार दिवस ती धुमसत असायची.दुसऱ्या दिवशी माझ्या आईसह शेजारपाजारच्या बायका त्या होळीच्या धगीवर पाणी तापवायच्या. असं म्हणतात की होळीच्या निखार्यांवर तापवलेल्या पाण्याने अंघोळ केली की सारे आजार बरे होतात. हे खरं की खोटं ते नाहीं सांगता यायचं मला, पण अशी मोठ्ठी होळी पेटवणं चुकिचंच. कारण अशा मोठ्ठ्या होळीत किती तरी झाडांची जळुन अक्षरश: राख होते. तीही एका क्षणात. झाडं मोठ्ठी व्हायला दहा वीस वर्ष लागतात आणि त्याची अशी एका क्षणात राख होणं चांगलं आहे का ? झाडं तोडू नक़ा. कुणाला तोडू देवू नका. जमलंच तर आयुष्यात एक तरी झाड लावा. मोठ्ठं करा आई बाबा तुम्हाला चालता येई पर्यँत तुमचं बोट धरून तुम्हाला आधार देतात तसं, झाडांमधे थोड़ं बळ येईपंर्यँत तुम्ही त्यांना. आधार दया. पुढं ती तुम्हाला आयुष्यभर आधार देतील. आपण त्यांच्यावर वर करतो तेव्हा ती कुठलीही तक्रार न करता ती जमीनदोस्त होतात. पण आपण झाडावरती नव्हे तर आपल्याच मुळांवरती घाव घालतो आहोत याची जाणीव आपल्याला कधीच होत नाहीं।
हे सारं पटतय ना तुम्हाला ऐवढं ऐकाल ना अक्कालरावाचं ?
ऐकाल म्हणताय चला तर मग एक गोड पापा द्या
पुन्हा भेटू या.



तुमचा
अक्कालराव