मला माहिती आहे माझ्यावर रागावलेले नाही. कारण तुम्ही तुमच्या खेळण्यात दंग होतात. कुणी आत्याकडे.........कुणी मामाकडे.......कुणी काकाकडे असे वेगवेगळ्या गावी गेला होतात. तिथल्या पाहुणचारावर मस्त ताव मारत होतात. आत्याने, मामाने आणि काकांनी केलेल्या कौतुकात बुडून गेला होतात. मग कशाला तुम्हाला अक्कलरावांची आठवण होईल ? पण तुम्हाला माझी आठवण आली नाही म्हणून मला काही तुमचा राग नाही आला.
उलट मला मात्र रोज तुमची आठवण होत होती. म्हणूनच मध्ये मी जगभर विमान प्रवास करण्यासाठी निघालो तेव्हा विमानात झालेल्या गंमती जंमती आणि एअर होस्टेस जवळ आम्ही व्यक्त केलेलं आमच्या जगभरच्या दौऱ्याच प्रयोजन आम्ही तुम्हाला विजयरावांच्या मार्फत मी तुम्हाला सांगितल. त्याच्या पुढची हि गंमत.
मुलांनो मी असं सारं जग फिरून आलो. पण आपल्या इथल्या मंत्रीमंडळांचे जागतिक दौरे जसे नेहमीच अयशस्वी ठरतात तसाच माझा जागतिक दौराही अयशस्वी ठरला.
मी जगभर फिरून आल्यानंतर माझ्या दौऱ्याचा एक अहवाल तयार केलाय. तो अहवाल पुढीलप्रमाणे -
" आपल्या इथले कावळे, " काव - काव " आणि चिमण्या, " चिव - चिव " याची जगाच्या दौर्यावर जाताना मी नोंद केली होती. आफ्रिकेत पोहोचल्यावर तिथल्या कावळ्यांच्या आणि चिमण्यांच्या आवाजाची नोंद करण्याचा मी प्रयत्न केला. पण तिथले कावळेही काव - कावच करतात आणि चिमण्याही चिव चिव करत त्यांना दाद देतात.
मला वाटला होतं अमेरिकेतल्या कावळ्यांचा रंग आपल्या इथल्या कावळ्यांच्या तुलनेत असेल गोरा. अहो पण कसचं काय तिथल्या कावळ्यांपेक्षा आपल्या इथल्या कावळ्यांचाच रंग बरा.
खर तर मला जगभरच्या प्रवासात ठिकठिकाणच्या मिसळचा.......वडापावचा.........इडलीसांबरचा......स्वाद चाखायचा होता. पण छे ! सारं जग फिरून आल्या नंतर मला कळलं हे सारं फक्त आपल्या भारतातच मिळतं. काही ठिकाणी मिळतही असं काही पण त्याला आपल्या इथल्या सारखी चटकदार चव नाही. सहाजिकच माझी खूप उपासमार झाली. त्यामुळेच यापुढे कोणत्याही कारणासाठी प्रदेश दौरा करायचा नाही असं मी ठरवून टाकलंय. "
तुमचा ...........
अक्कलराव
मित्रांनो आणखी एक गोष्ट अक्कलरावांनी तुम्हाला सांगितलीच नाही. ती मी सांगतो. अंटार्तिकात गेल्यावर अक्कलरावांना तिथली बर्फाची गाडी खूप आवडली. साहजिकच त्यांनी विमान तिथच सोडून दिलं आणि तिथल्या बर्फाच्या गाडीत बसून ते परतीच्या प्रवासाला निघाले. पण विषवृत्त ओलांडताना त्यांची बर्फाची गाडी वितळून गेली आणि अक्कलरावांना मजल दरमजल करत पुढचा प्रवास करावा लागला.
अन्यथा आज अक्कलराव आपल्या पुण्यातल्या रस्त्यातून बर्फाच्या गाडीत बसून फिरताना आपल्याला दिसले असते.
.तुमचा ............
छे ! मी माझं नाव तुम्हाला सांगणार नाही. मी तुम्हाला हि अक्कलरावांची फजिती सांगितली हे अक्कलरावांना कळाल तर ते माझ्यावर रागवतील ना !
No comments:
Post a Comment