Saturday, May 29, 2010

जग किती देखण


                खूप दिवस झालं नाही तुम्हाला भेटलो नाही. 
                   नाही, मी तुम्हाला विसरलो नव्हतो काही. खूप अडचणी होत्या. कायये माहिती आहे का ? जसं इथ मी तुमच्यासाठी लिहितो ना तसच दुसऱ्या एका ठिकाणी तुमच्या मोठ्ठ्या ताई आणि दादासाठी लिहितो. त्या ठिकाणी लिहिताना काही अडचणी आल्या होत्या. त्यातून मार्ग काढता काढता हे असं तुमच्या माझ्या भेटीमध्ये बारा पंधरा दिवसांचं अंतर पडलं. दहा दिवस गेले माझे त्या अडचणीतून मार्ग काढताना. मला मार्ग सापडला तेव्हा मी सुटकेचा श्वास घेतला. 
                  झालतं काय ! तुमच्यासाठी जशी मी काही चित्र टाकतोना इथं तशीच त्यांच्यासाठीही काही चित्र टाकतो. अचानक ती चित्र दिसायाचच बंद झालं होतं.
               हे सारं तुम्हाला सांगण्याचा कारण म्हणजे अडचण आली म्हणून कधी थांबू नये आपण हे तुम्हाला कळावं.
         बरं मग सुट्टी कशी चाललीय ? मजा करताय ना ? तुम्ही जसे फिरतंय ना गावोगाव तसेच अक्कलरावही गेलेत फिरायला. तेही इथं तिथं जवळपास नाही काही पार अगदी साता समुद्राच्या पल्याड. आणि गेलेत कसे माहिती आहे चक्क विमानात बसून. त्यांना असा जगभर फिरून काय काय करायचं होतं ते सांगिनच मी तुम्हाला लवकर. तुर्तास जग किती देखण आहे हे पहा तर खर -



 हे अफ्रिकेतल जंगल 

       आणि ही अफ्रिकेतली लिम्पापो नदी. तुम्हाला माहिती आहे लिम्पापो म्हणजे  पाण्यातली मगर. या नदिमधे आशा खुप मगरी आहेत म्हणून या नदीचा नाव लिम्पापो.  



 

                 
  
  हा कोण माहितीच आहे तुम्हाला ! पेग्विन

आपल्याकडे एक मोठ्ठ्या चौसोपी 
वाडयात एक मोठ्ठ खटल रहाताना 
तस हेपेग्विनच एक मोठ्ठ खटल  
                                                   तुमचा विश्वास बसेल जर मी तुम्हाला म्हणालो की ही हिरवाई अमेरिकेतली आहे तर 

  

ही हिरवाई सुद्धा अमेरिकेतलीच   

सूर्यास्त कुठलाही असो. आपल्या इथला, कोकणातला, कन्याकुमारीचा अथवा दक्षिण आफ्रिकेतल्या सहारा वाळवंटातला. दिसतो छानच.  


वाळवंट ! किती अगम्य ?
                                                      अशी चित्र काढणं आपल्या आवाक्यातल आहे ?                                                                                        
                 

                                                                    
 वाळूचा कागद .........वाळूचा ब्रश ..........असं चित्र पाहताना कोण होणार नाही वश !

                                        


" ताजमहाल " ना शहाजहांचा ना मुमताजचा तो माणुस म्हणून माणसावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा  


                                                     " ताजमहाल " आमच्या देशाची स्पंदन







Saturday, May 15, 2010

आईचं बाळ

      आईचं बाळ तुम्ही मोठे असता घरात. आणि तुमच्यानंतर घरात येतं एक छोटसं बाळ. गोरंगोरंपान, इवल्या इवल्या मुठी असणार, फुल उमलाव तसं खुदकन हसणारं.
          तुम्ही तुमचा अभ्यास, तुमचं खेळणं सारं सारं विसरून त्या बाळाशी खेळत राहता.
          खूप छान वाटतं नाही त्याच्या कापसासारख्या मऊ कायेला स्पर्श करताना. अशाच एका बाळाविषयी हि कविता -

बाळ तुझं लाडोबा


             आपण आईच्या कुशीतून जन्म घेतो. हे नजरेत न मावणारं जग लुक लुक डोळ्यांनी पाहत राहतो. आई खूप खूप प्रेम करत असते आपल्यावर. तिच्या मांडीवर खेळायचं, तिच्या हातानं भरवून घ्यायचं, तिच्या कुशीत निजायचं, तिचं बोट धरून पाहिलं पाउल टाकायचं. पाटी नाही, पुस्तक नाही. शाळा नाही, खेळ नाही. सारखं आपलं तिच्या अवतीभवती भिरभिरत रहायचं. ती सुद्धा आपली आठवण आली कि मधेच वेळ काढणार. कधी येवून आपली पापी घेणार. कधी हळूच आपल्या गुबगुबीत गालाच्या पाकळ्या ओढणार. कधी कधी तिला आपल्यावर माया करायचं इतकं भरतं येत कि ती सारं काम आहे तसंच टाकून देते आणि पटकन येवून आपल्याला पदराखाली घेते. आपणही मग मजेत कृष्ण होवून ते अमृतपान करत राहतो.
                अशी दोन चार वर्ष सुखात जातात. कुणास ठावूक कुठून पण घरात पुन्हा एक छोटसं बाळ येतं. आपल्याहूनही छोटसं. गोरंगोरंपान, इवल्या इवल्या मुठी असणार, फुल उमलाव तसं खुदकन हसणारं. मस्त वाटत आपल्याला सुरवातीला. त्याच्याशी खेळताना, त्याची पापी घेताना, त्याच्याशी बोबडं बोलताना खूप खूप आनंद होतो. आपण त्याची मोठ्ठी ताई आहोत म्हणून अभिमानही वाटतो. 
                कधी कधी त्याचं काय बिनसतं कुणास ठावूक. खुदकन हसायचं सोडून ते मधेच सप्तसूर लावतं. मग आपण रागावतोही त्याला. ते आणखीनच गळा काढत.

                आपण त्याला असे रागावतो. आणि आई स्वयंपाक घरातून येवू धपक्कन पाठीत एक धपाटा ठेवून देते आपल्या. खरंतर खूप जोरात मारलेलं नसतं आईनं आपल्याला. पण तरी आपण सूर काढून रडायला लागतो. डोळे भरून येतात. आभाळासारखे बरसू लागतात. आपण असे कुण्णी कुण्णी नसल्यासारखे रडत असताना आई आपल्याला जवळही घेत नाही. उलट त्या इटुकल्या पिटुकल्यालाच पदराखाली घेते. झालं हिरोचा सूर लगेच बंद. आपण मात्र रडतोच आहोत कोपऱ्यात बसून.

                आईचं हे असं वागणं पाहून, " आई मी मोठ्ठी झाले म्हणून माझं काही चुकलं का गं ? अगं छोट्या बाळाला जशी तुझ्या मायेची गरज आहे तशी मला सुद्धा तुझ्या मायेची खूप गरज असते गं. तेव्हा तू बाळाचे लाड कर पण कधी कधी माझेही थोडे लाड करत जा ना." अशी आईला लाडी गोडी लावणारी हि मुलगी.                      
 
 

Tuesday, May 11, 2010

राक्षसपूरचा राक्षस

मुलांनो अक्कलराव आवडतोय ना तुम्हाला ? त्याच्याशी बोलताना मजा वाटतेय ना ? त्याच्याशी मैत्री करायला आवडेल ना तुम्हाला ?

आवडेल म्हणताय ! खूप छान.

मित्रांनो तुम्ही जसे मित्र आहात ना अक्कलरावाचे तसेच आणखी खूप मित्र आहेत अक्कलरावाचे. परवा तुम्हाला भेटलेला झाडासाठी टोपी शिवण्याच स्वप्न पहाणारा छोटा मुलगा जसा मित्र आहे ना अक्कलरावाचा तसाच राक्षसपूर नावाच्या गावातील एक राक्षस हि मित्र आहे अक्कलरावाचा.

अरे ! असे घाबरू नका राक्षस म्हणालं कि लगेच. हा राक्षस काही गोष्टीतल्या नेहमीच्या राक्षससारखा आडदांड नाही. राक्षसपूरमधला हा राक्षस खूप प्रेमळ आहे. त्याच्या अंगावर केस नाहीत. डोक्यावर शिंग नाहीत. त्याचे डोळे आगीचे लाल गोळे नाहीत आणि त्याच्या तोंडात लांबलचक सुळेही नाहीत. त्याला गाडीभर खायला तर लागत नाहीच पण पाणी किती लागतं प्यायला तर फक्त चमचाभर. आहे कि नाही मजेशीर राक्षस .

हा राक्षस तुम्हाला त्याच्याजवळ असलेल्या चोकलेट मधलं अर्ध चोकलेट तर देतोच पण तुमची गोड पापीही घेतो.

तुम्हीही भेटा त्याला आणि त्यांनी पापी घेतली कि कसं वाटलं ते ही सांगा.

Sunday, May 9, 2010

मातृदिन. ९ मे

"चला चला चला. खेळत काय बसलात ? इकडे या सगळे."
"काय म्हणालात. आम्हाला आमचा खेळ सोडून एवढ्या तातडीने का बोलावलत ?"
"सांगतो. सांगतो. आज काय आहे माहिती आहे का तुम्हाला ?"
" नाही ना ? सहाजिकच आहे. लहान आहात तुम्ही अजून. पण तरही हे तुम्हाला माहिती असलंच पाहिजे. कारण तो एक आपल्या संस्काराचा भाग आहे. म्हणून तर तुम्हाला एवढ्या तातडीने बोलावलंय."
"हं ! तर मुलानो आज आहे मातृदिन. ९ मे . लक्षात ठेवाल ना यापुढे ! "
"
काय म्हणालात ? मातृदिन म्हणजे काय असतं ?"
"
मुलांनो. मातृदिन म्हणजे आईची थोरवी गाण्याचा दिवस. आईच्या मोठेपणाच स्मरण करण्याचा दिवस. आई आपल्यासाठी राबते. झिजते. हाडाची काड करते. पण आपण कधी तिचे आभार सुद्धा मानत नाही. तिच्यावर कधी सुखाचे चार शब्द उधळत नाही. जगभरातल्या प्रत्येक मुलांना आपल्या आईविषयी कृतन्यता व्यक्त करावी म्हणून जगभरात आज हा दिवस साजरा केला
जातो. "
"म्हणजे काय करायच अक्कलराव ? असं अजिबात विचारू नका. "
"करायचं म्हणलं तर खूप काही करता
येण्यासारखं आहे. खूप काही करू नका. फक्त आज आईला त्रास द्यायचा नाही. म्हणजे इतर दिवशी द्यायचा असं नव्हे. पण आज मात्र तिला थोडाही त्रास द्यायचा नाही. तिच्याजवळ कुठलाही हट्ट करायचा नाही. तिनं सांगितलेलं प्रत्येक काम ऐकायचं आणि तिची गोड पापी घेवून तिचं असंच अखंड प्रेम लाभावं म्हणून देवाजवळ प्रार्थना करायची."
"मुलांनो आईच्या वेदना, तिचे कष्ट, तिचं सोसणं, तिनं आपल्यासाठी केलेली धडपड यापैकी
कश्शा कश्शाची जाणीव नसते आपल्याला. या साऱ्याची जाणीव ठेवण्याचा हा दिवस."
"आई जशी आपल्याला असते तशीच
पाखरांना असते........वासरांना असते. वाघाच्या बछडयाला असते आणि गाढवाच्या गाधडयालाही असते."
"आकाशातून आपल्या पिलांवर झडप घालणाऱ्या बलाढ्य घारीवर कोंबडीसारखा सामान्य जीव धावून जातो. कारण ती आई असते. बस्स ! एवढंच लक्षात ठेवा आणि यापुढे आईला त्रास देणं बंद करा ."
"कराल ना
एवढ ?"
"सगळेच हो म्हणाले. चला ! मला आजचा दिवस सार्थकी लागल्यासारखा वाटतो आहे. अरे पण असे पळताय कुठे सगळे ?"

"आईच्या कुशीत शिरायला ? ठीक आहे. ठीक आहे. चला मी हि निघालो माझ्या आईच्या कुशीत शिरायला."

Friday, May 7, 2010

चित्र आणि खरेपणा


















चित्र काढायला आवडतं ना तुम्हाला ?
                      व्वा ! चित्रं या  विषयाबरोबर काय सरसावून बसलात सगळेच . हे वरचं चित्रं कुणी काढलं असेल असं वाटतंय तुम्हाला ?
                     माहित नाही म्हणताय. सांगतो.
                     अक्कलरावांच्या शेजारी एक  जयुराणी राहते. हो ! हो ! तोच तो राजा. जयुराणी हे त्याचं लाडाच नाव. खरं नाव जयेश. तर चित्रकला हा त्याचा   खूप आवडता विषय. असं असला तरी पठ्ठ्या वर्षभरात कधीही चित्रकलेची वही आणि रंग हाती घ्यायचा नाही. वर्ष संपता संपता चित्रकलेचे शिक्षक  चित्रकलेची वही पूर्ण करायचा आग्रह  करायचे. जयुराणीला आलेलं टेन्शन. वार्षिक परीक्षा तोंडावर आलेली आणि अशात अभ्यास सोडून चित्रकलेची  वही पूर्ण करत कसं बसायचा ? बरं चित्रं तरी किती काढायची ! एक  दोन नव्हे…………… चक्कं वीसहून अधिक. चित्रांचे विषयसुद्धा असेच पेचात पाडणारे . रक्षाबंधन, बस थांबा, पावसाळ्यातील एक दिवस, स्वातंत्र्यदिन …………एकपेक्षा  दुसरा  कठीण .
                    जयुराणी गेली बाबांकडे. सारं काही बाबांना सांगितल आणि  म्हणाली, " बाबा  मला  काही  चित्रं  काढून  द्या  ना .”
                    जयुराणीच्या बाबांनाही चित्रं काढायला आवडायचं. त्यांनी लगेच एक दोन दिवसात जयुराणीला काही चित्रं काढून दिली. त्यातलंच एक  ' पावसाळ्याच्या दिवसातलं चित्रं.'
                    झालं. चित्रकलेची वही पूर्ण झाली. जयुराणीनं ती त्याच्या शिक्षकांना दाखवली. आणि ' पावसाळ्याच्या दिवसातल ' ते चित्रं पाहताच सर  म्हणाले, "हे  चित्रं  तू  काढलस  ?”
                    “नाही  सर. हे चित्रं माझ्या बाबांनी काढलंय." सरांनी  त्या  चित्राला दहा पैकी सात मार्क दिले .
                    जयुराणीनं घरी आल्यावर बाबांना हे सारं सांगितलं. खरं बोलल्याबद्दल बाबांनी जयुराणीला शाब्बासकी दिली. पण  जयुराणीसमोर  प्रश्नचिन्ह. त्याची शंका. त्यानं बाबांना विचारली, “ पण बाबा सरांनी तुम्ही एवढ छान काढलेल्या चित्राला सातच मार्क का दिले  ?”
                    “हे बघ बेटा. खरं तर सरांनी त्या चित्राला शून्याच मार्क द्यायला हवे होते. पण त्यांनी सात मार्क दिले ते चित्राला नव्हे तर तुझ्या खरेपणाला .” बाबांनी जयुराणीला समजावून सांगितलं.
                    “पण एक लक्षात ढेव, यापुढे असं कधीच करायचं नाही. तुझं काम तूच  करायचं .”
                     जयुराणीनं बाबांना पुन्हा असं न करण्याचं वचन दिलंय. आणि तुम्हीसुद्धा असं कधीच वागणार नाही याची मला खात्री आहे. चित्रं   काढायला जमत नसतील तर उन्हात खेळण्या ऐवजी थोडी चित्रं काढण्याचा सराव करा. 

Wednesday, May 5, 2010

शाळेचा रिझल्ट

    काय मुलांनो, परवाची गोष्ट वाचलीत ना ?

आवडली कि नाही ?
खूप खूप आवडली.
बहोत अच्छे !
हो पण तुमच्या निकालाचा काय ? निकाल लागले असतिल ना आता सगळ्यांचे ?
सॉरी ! आपण ' निकाल लागला असेल ' या ऐवजी ' रिझल्ट लागला असेल ' असा म्हणू या. कारण ' निकाल लागणे ' हं शब्दप्रयोग ' वाईट होणं ' या अर्थाने हि वापरला जातो. म्हणून आपण 'रिझल्ट लागला ' असेल असंच म्हणू या.
हं ! मग लागलेत ना सगळ्यांचे रिझल्ट. कुणाकुणाला किती टक्के मार्क मिळाले.
८० टक्के, ९० टक्के, ९७ टक्के, ९१ टक्के, ९४ टक्के ................ बापरे ! एवढे टक्के ? कमाल आहे तुमची.
काय ? ढमप्याला फक्त ५० टक्केच मार्क मिळाले. आणि म्हणून तो रडतोय.
ढमप्या हे बघ असं रडायचं नाही. सगळे लक्ष देवून ऐका. हे पहा मुलांनो मार्क चांगले पडायला हवेत हे खरं. त्यासाठी खूप अभ्यास करायला हवा हे हि खरं. पण अगदीच पुस्तकी किडा व्हायला नको काही. अभ्यासाचा आनंद घेता आला पाहिजे.

आणि
ढमप्या तुला मार्क कमी पडले म्हणून तू काही लगेच परवाच्या गोष्टीतल्या कोकिळे सारखं रडत बसायला नको काही. मार्क आणि बुद्धिमत्ता यांचा एकमेकांशी संबंध आहे हे जरी खरं असलं तरी, कमी मार्क म्हणजे ढ गोळा असं नव्हे काही. तू गेल्यावर्षी खूप खेळला असशील. हो कि नाही ?
मग ! असं नाही करायचं. आता दोन महिने खूप खेळ. पण एकदा शाळा सुरु झाली कि मग रोज फक्त अर्धाच तास खेळायचं. आणि खेळून आलं कि मन लावून अभ्यास करायचा. हो हो रविवारी खेळायचं थोडं जास्त. मग बघ तूच मला पुढच्या वर्षी सांगशील ," अक्कलराव मलासुद्धा ८० टक्के मार्क मिळाले. "
ऐकशील ना माझं ? ओ. के. ! पळ तर मग खेळायला. मस्त मजा कर.

Tuesday, May 4, 2010

प्राण्यांच्या शाळेचा निकाल.


आपल्या शहरात मुला मुलींच्या शाळा असतात. तशीच जंगलातही प्राण्यांची एक शाळा होती. त्यांची शाळा वाडाच्या एका मोठ्ठ्या झाडाखाली भरायची. सात माणसांच्या कवेत मावणार नाही इतकं ते झाड मोठं होतं. सारे प्राणी त्या झाडाखाली जमायचे. मन लावून शिकायचे. गुरुजींचा नाव होतं पोपटराव. उंट, हत्ती, घोडे, गाढव, चिमण्या, कावळे, कोकीळ, मैना, लांडगे, कोल्हे सारे सारे त्या शाळेत जायचे. मन लावून अभ्यास करायचे. त्यांची लेखी परिक्षाही व्हायची. आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा परीक्षेचा निकालही लागायचा.
मुलांनो कालच त्या सार्यांच्या परीक्षेचा निकाल लागला. सगळ्यांचे आई बाबा सोबत होते. सगळे पास झाले.............नापास झाली ती फक्त कोकिळा.

सगळे पास झाले म्हणून कोकिळेला फार आंनंद झाला. पण आपण नापास झालो याचंही फार वाईट वाटलं. तिचं उडणं - बागडणं, हसणं - गाणं सारं बंद झालं

दोन दिवस झाले. चार दिवस झाले. पण जंगलात कुठेही कोकिळेचा आवाज ऐकू येईना. पास झालेल्या साऱ्यांची खूप दंगा - मस्ती चाललेली. आपण सारे पास झालोत या आनंद सोहोळ्यात सारे हरवून गेलेले. पण हळू हळू त्यांच्या लक्षात आला कि," अरे आपण सारे मस्त मजेत दंगा मस्ती करतो आहोत. पण कोकिळेचा आवाज कोठूनही ऐकू येत नाही. आपण खेळतो आहोत पण आपल्याला तिच्या गाण्याची संगत नाही."सहजिकच साऱ्यांना खूप खूप चुकल्या चुकल्या सारखा वाटत होतं.

चौथ्या दिवशी साऱ्यांनी आपला खेळ दिला सोडून आणि सारे गेले कोकिळेच्या घरी. तर कोकिळा अजूनही रडत बसलेली. रडून रडून तिचे डोळे लाल झालेले. चेहरा कोमेजलेला. साऱ्यांना खूप वाईट वाटलेलं तिची अशी अवस्था पाहून. प्रत्येकजण आपापल्यापरीनं तिची समजूत काढू लागला.

मैना म्हणाली," ये रडूबाई, असं रडून काय होणार ? चलं पुढच्या वर्षी खूप अभ्यास कर मग बघ तू नक्की पास होशील."

माकड म्हणालं," हे गानतपस्विनी, अशी रडू नकोस. हे बघ पुढच्या वर्षी मी मदत करीन तुला अभ्यासात. पण आता रडणं बंद कर पाहू."

चिवचिव चिवचिव करत चिमणी म्हणाली ," आत्याबाई. पुरे आता. दोघी मिळून खूप अभ्यास करू पुढच्या वर्षी. मग बघू तुम्ही कशा नापास होतंय ते."

साऱ्यांचा एकाच दंगा चाललेला. शेवटी पंखामध्ये मान खुपसून रडत बसलेल्या कोकिळेला मान वर करावीच लागली. कसे बसे डोळे पुसत हमसून हमसून ती म्हणाली," अरे माझ्या मित्रांनो कसं सांगू तुम्हाला. अरे, मी खंरच खूप अभ्यास करते रे. पण गणित, इंग्रजी या विषयातलं मला खंरच काही काळात नाही रे. खंरच मी कध्धी कध्धी पास होणार नाही."

कोकिळेच म्हणणं साऱ्यांना पटत होतं. ती खरच खूप खूप अभ्यास करायची हेही साऱ्यांना माहित होतं. पण तिचं रडू तर थांबायलाच हवं होतं. रडून रडू तिचा गळा बसला तर तिचं गाणं आपल्याला पुन्हा कधीच ऐकायला मिळणार नाही याची जाणीव साऱ्यांना होती. म्हणून पुन्हा पुन्हा सारे तिला समजावत राहिले. शेती साऱ्यांच्या समाधानासाठी कोकिलेन तिचं रडू आवरलं. अंधार पडू लागला होतं. हळू हळू सारे आपापल्या घरट्याकडे परतू लागले. पण जाता जाता साऱ्यांनी ठरवलं यातून काही तरी मार्ग काढायलाच हवा. पुढच्या वर्षी कोकिळा पास व्हायलाच हवी.

दोन दिवस साऱ्यांनी खूप खल केला. पण कोणाचंही डोकं चालेना. पण ठरल्याप्रमाणे सारे दोन दिवसांनी शाळेत जमले. सिंह महाराज म्हणाले," हं ! सुचलाय का कोणाला काही मार्ग ?"

पण कोणीच काही बोलेना. सारे पडेल चेहऱ्याने बसलेले.गप........ गप. सारं काही शांत.

"महाराज माझ्याकडे आहे मार्ग " सगळ्यांच्या मागून आवाज आला. "अरे ! हा तर गाढवाचा आवाज ." असं म्हणत साऱ्यांनी मागे वळून पाहिलं. गाढवाला सारेच बुद्धू समजायचे . साहजिकच साऱ्यांनी त्याची खूप टर उडवली.

"अरे सर्वात गोळा तू . आणि तू काय मार्ग दाखवणार ?" छद्मी हसत कोल्हा म्हणाला.

" खामोश ! " जंगलचा राजा सिंह गरजला." कोल्हेमामा, आपण प्राणी आहोत. दुसऱ्याला स्वतःपेक्षा कमी लेखायला आपण काही माणसं नाही आहोत."

"गाढवदादा, सांगा बरं तुमचा विचार." खजील झालेल्या गाढवाकडे पाहून सिंह म्हणाला.

सगळ्यांनीच टिंगल केल्यामुळे गाढव थोड बुजलच होतं. आपला विचार सारयांपुढे मांडवा कि मांडू नये या विचारात पडलं होतं. जंगलच्या राजानं गाढवाची हि द्विधा मनस्थिती ओळखली. गाढवाला धीर देत ते म्हणाले," गाढवादादा असे घाबरू नका. मोकळ्या मानाने सांगा तुम्हाला काय वाटत ते."

"
महाराज," गाढव धीर करून बोलू लागलं. " कसं आहे पहा. आपण सारेच थोडे बहुत माणसाळंलेले. तुमचेसुद्धा काही भाईबंद सर्कशीत, प्राणी संग्रहालयात असतात. माकड भाऊ काय, घोडेराव काय, मी काय, चिवूताई काय आम्हा साऱ्यांची माणसांच्या कडेकडेने उठबस असते. म्हणून आम्हा साऱ्यांना गणित, इतिहास, भूगोल या साऱ्या विषयातल थोडं बहुत कळतं आणि म्हणून आम्ही सारे पास होतो. पण कोकिळाताई काही माणसांच्या वाऱ्याला उभी राहत नाही. पण मानसं मात्र चोरून तिचं गाणं ऐकतात आणि गवई होतात. त्यांच्या संगीत शाळाही असतात. त्यात मोठ मोठ्या पदव्याही असतात. त्यामुळे कोकिळाताई साठी आपण संगीत हा विषय ठेवला तर ती नक्की पास होईल. तेही पहिल्या नंबराने. हो ! आता संगीतात मी पास होणार नाही पण कोकिळाताई नक्की पास होईल."

गाढवाच्या या विनोदावर सारेच पोटधरून हसले.

" व्वा ! काय मस्त मार्ग आहे. आमची यास संमती आहे." सिंहराजाने गाढवाच्या तोडग्यावर राजकीय शिक्कामोर्तब केले. सारे कोकिळेच्या घरी गेले. कोकीळेसाठी संगीत हा विषय आणि त्यासाठी सिंहाचं मान्यता पत्र त्यांनी कोकिळेला दाखवलं. आणि मग कोकिळा पुन्हा आनंदाने गाऊ लागली.