Tuesday, May 4, 2010

प्राण्यांच्या शाळेचा निकाल.


आपल्या शहरात मुला मुलींच्या शाळा असतात. तशीच जंगलातही प्राण्यांची एक शाळा होती. त्यांची शाळा वाडाच्या एका मोठ्ठ्या झाडाखाली भरायची. सात माणसांच्या कवेत मावणार नाही इतकं ते झाड मोठं होतं. सारे प्राणी त्या झाडाखाली जमायचे. मन लावून शिकायचे. गुरुजींचा नाव होतं पोपटराव. उंट, हत्ती, घोडे, गाढव, चिमण्या, कावळे, कोकीळ, मैना, लांडगे, कोल्हे सारे सारे त्या शाळेत जायचे. मन लावून अभ्यास करायचे. त्यांची लेखी परिक्षाही व्हायची. आणि मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा परीक्षेचा निकालही लागायचा.
मुलांनो कालच त्या सार्यांच्या परीक्षेचा निकाल लागला. सगळ्यांचे आई बाबा सोबत होते. सगळे पास झाले.............नापास झाली ती फक्त कोकिळा.

सगळे पास झाले म्हणून कोकिळेला फार आंनंद झाला. पण आपण नापास झालो याचंही फार वाईट वाटलं. तिचं उडणं - बागडणं, हसणं - गाणं सारं बंद झालं

दोन दिवस झाले. चार दिवस झाले. पण जंगलात कुठेही कोकिळेचा आवाज ऐकू येईना. पास झालेल्या साऱ्यांची खूप दंगा - मस्ती चाललेली. आपण सारे पास झालोत या आनंद सोहोळ्यात सारे हरवून गेलेले. पण हळू हळू त्यांच्या लक्षात आला कि," अरे आपण सारे मस्त मजेत दंगा मस्ती करतो आहोत. पण कोकिळेचा आवाज कोठूनही ऐकू येत नाही. आपण खेळतो आहोत पण आपल्याला तिच्या गाण्याची संगत नाही."सहजिकच साऱ्यांना खूप खूप चुकल्या चुकल्या सारखा वाटत होतं.

चौथ्या दिवशी साऱ्यांनी आपला खेळ दिला सोडून आणि सारे गेले कोकिळेच्या घरी. तर कोकिळा अजूनही रडत बसलेली. रडून रडून तिचे डोळे लाल झालेले. चेहरा कोमेजलेला. साऱ्यांना खूप वाईट वाटलेलं तिची अशी अवस्था पाहून. प्रत्येकजण आपापल्यापरीनं तिची समजूत काढू लागला.

मैना म्हणाली," ये रडूबाई, असं रडून काय होणार ? चलं पुढच्या वर्षी खूप अभ्यास कर मग बघ तू नक्की पास होशील."

माकड म्हणालं," हे गानतपस्विनी, अशी रडू नकोस. हे बघ पुढच्या वर्षी मी मदत करीन तुला अभ्यासात. पण आता रडणं बंद कर पाहू."

चिवचिव चिवचिव करत चिमणी म्हणाली ," आत्याबाई. पुरे आता. दोघी मिळून खूप अभ्यास करू पुढच्या वर्षी. मग बघू तुम्ही कशा नापास होतंय ते."

साऱ्यांचा एकाच दंगा चाललेला. शेवटी पंखामध्ये मान खुपसून रडत बसलेल्या कोकिळेला मान वर करावीच लागली. कसे बसे डोळे पुसत हमसून हमसून ती म्हणाली," अरे माझ्या मित्रांनो कसं सांगू तुम्हाला. अरे, मी खंरच खूप अभ्यास करते रे. पण गणित, इंग्रजी या विषयातलं मला खंरच काही काळात नाही रे. खंरच मी कध्धी कध्धी पास होणार नाही."

कोकिळेच म्हणणं साऱ्यांना पटत होतं. ती खरच खूप खूप अभ्यास करायची हेही साऱ्यांना माहित होतं. पण तिचं रडू तर थांबायलाच हवं होतं. रडून रडू तिचा गळा बसला तर तिचं गाणं आपल्याला पुन्हा कधीच ऐकायला मिळणार नाही याची जाणीव साऱ्यांना होती. म्हणून पुन्हा पुन्हा सारे तिला समजावत राहिले. शेती साऱ्यांच्या समाधानासाठी कोकिलेन तिचं रडू आवरलं. अंधार पडू लागला होतं. हळू हळू सारे आपापल्या घरट्याकडे परतू लागले. पण जाता जाता साऱ्यांनी ठरवलं यातून काही तरी मार्ग काढायलाच हवा. पुढच्या वर्षी कोकिळा पास व्हायलाच हवी.

दोन दिवस साऱ्यांनी खूप खल केला. पण कोणाचंही डोकं चालेना. पण ठरल्याप्रमाणे सारे दोन दिवसांनी शाळेत जमले. सिंह महाराज म्हणाले," हं ! सुचलाय का कोणाला काही मार्ग ?"

पण कोणीच काही बोलेना. सारे पडेल चेहऱ्याने बसलेले.गप........ गप. सारं काही शांत.

"महाराज माझ्याकडे आहे मार्ग " सगळ्यांच्या मागून आवाज आला. "अरे ! हा तर गाढवाचा आवाज ." असं म्हणत साऱ्यांनी मागे वळून पाहिलं. गाढवाला सारेच बुद्धू समजायचे . साहजिकच साऱ्यांनी त्याची खूप टर उडवली.

"अरे सर्वात गोळा तू . आणि तू काय मार्ग दाखवणार ?" छद्मी हसत कोल्हा म्हणाला.

" खामोश ! " जंगलचा राजा सिंह गरजला." कोल्हेमामा, आपण प्राणी आहोत. दुसऱ्याला स्वतःपेक्षा कमी लेखायला आपण काही माणसं नाही आहोत."

"गाढवदादा, सांगा बरं तुमचा विचार." खजील झालेल्या गाढवाकडे पाहून सिंह म्हणाला.

सगळ्यांनीच टिंगल केल्यामुळे गाढव थोड बुजलच होतं. आपला विचार सारयांपुढे मांडवा कि मांडू नये या विचारात पडलं होतं. जंगलच्या राजानं गाढवाची हि द्विधा मनस्थिती ओळखली. गाढवाला धीर देत ते म्हणाले," गाढवादादा असे घाबरू नका. मोकळ्या मानाने सांगा तुम्हाला काय वाटत ते."

"
महाराज," गाढव धीर करून बोलू लागलं. " कसं आहे पहा. आपण सारेच थोडे बहुत माणसाळंलेले. तुमचेसुद्धा काही भाईबंद सर्कशीत, प्राणी संग्रहालयात असतात. माकड भाऊ काय, घोडेराव काय, मी काय, चिवूताई काय आम्हा साऱ्यांची माणसांच्या कडेकडेने उठबस असते. म्हणून आम्हा साऱ्यांना गणित, इतिहास, भूगोल या साऱ्या विषयातल थोडं बहुत कळतं आणि म्हणून आम्ही सारे पास होतो. पण कोकिळाताई काही माणसांच्या वाऱ्याला उभी राहत नाही. पण मानसं मात्र चोरून तिचं गाणं ऐकतात आणि गवई होतात. त्यांच्या संगीत शाळाही असतात. त्यात मोठ मोठ्या पदव्याही असतात. त्यामुळे कोकिळाताई साठी आपण संगीत हा विषय ठेवला तर ती नक्की पास होईल. तेही पहिल्या नंबराने. हो ! आता संगीतात मी पास होणार नाही पण कोकिळाताई नक्की पास होईल."

गाढवाच्या या विनोदावर सारेच पोटधरून हसले.

" व्वा ! काय मस्त मार्ग आहे. आमची यास संमती आहे." सिंहराजाने गाढवाच्या तोडग्यावर राजकीय शिक्कामोर्तब केले. सारे कोकिळेच्या घरी गेले. कोकीळेसाठी संगीत हा विषय आणि त्यासाठी सिंहाचं मान्यता पत्र त्यांनी कोकिळेला दाखवलं. आणि मग कोकिळा पुन्हा आनंदाने गाऊ लागली.

No comments: