Saturday, May 15, 2010

बाळ तुझं लाडोबा


             आपण आईच्या कुशीतून जन्म घेतो. हे नजरेत न मावणारं जग लुक लुक डोळ्यांनी पाहत राहतो. आई खूप खूप प्रेम करत असते आपल्यावर. तिच्या मांडीवर खेळायचं, तिच्या हातानं भरवून घ्यायचं, तिच्या कुशीत निजायचं, तिचं बोट धरून पाहिलं पाउल टाकायचं. पाटी नाही, पुस्तक नाही. शाळा नाही, खेळ नाही. सारखं आपलं तिच्या अवतीभवती भिरभिरत रहायचं. ती सुद्धा आपली आठवण आली कि मधेच वेळ काढणार. कधी येवून आपली पापी घेणार. कधी हळूच आपल्या गुबगुबीत गालाच्या पाकळ्या ओढणार. कधी कधी तिला आपल्यावर माया करायचं इतकं भरतं येत कि ती सारं काम आहे तसंच टाकून देते आणि पटकन येवून आपल्याला पदराखाली घेते. आपणही मग मजेत कृष्ण होवून ते अमृतपान करत राहतो.
                अशी दोन चार वर्ष सुखात जातात. कुणास ठावूक कुठून पण घरात पुन्हा एक छोटसं बाळ येतं. आपल्याहूनही छोटसं. गोरंगोरंपान, इवल्या इवल्या मुठी असणार, फुल उमलाव तसं खुदकन हसणारं. मस्त वाटत आपल्याला सुरवातीला. त्याच्याशी खेळताना, त्याची पापी घेताना, त्याच्याशी बोबडं बोलताना खूप खूप आनंद होतो. आपण त्याची मोठ्ठी ताई आहोत म्हणून अभिमानही वाटतो. 
                कधी कधी त्याचं काय बिनसतं कुणास ठावूक. खुदकन हसायचं सोडून ते मधेच सप्तसूर लावतं. मग आपण रागावतोही त्याला. ते आणखीनच गळा काढत.

                आपण त्याला असे रागावतो. आणि आई स्वयंपाक घरातून येवू धपक्कन पाठीत एक धपाटा ठेवून देते आपल्या. खरंतर खूप जोरात मारलेलं नसतं आईनं आपल्याला. पण तरी आपण सूर काढून रडायला लागतो. डोळे भरून येतात. आभाळासारखे बरसू लागतात. आपण असे कुण्णी कुण्णी नसल्यासारखे रडत असताना आई आपल्याला जवळही घेत नाही. उलट त्या इटुकल्या पिटुकल्यालाच पदराखाली घेते. झालं हिरोचा सूर लगेच बंद. आपण मात्र रडतोच आहोत कोपऱ्यात बसून.

                आईचं हे असं वागणं पाहून, " आई मी मोठ्ठी झाले म्हणून माझं काही चुकलं का गं ? अगं छोट्या बाळाला जशी तुझ्या मायेची गरज आहे तशी मला सुद्धा तुझ्या मायेची खूप गरज असते गं. तेव्हा तू बाळाचे लाड कर पण कधी कधी माझेही थोडे लाड करत जा ना." अशी आईला लाडी गोडी लावणारी हि मुलगी.                      
 
 

No comments: