चित्र काढायला आवडतं ना तुम्हाला ?
व्वा ! चित्रं या विषयाबरोबर काय सरसावून बसलात सगळेच . हे वरचं चित्रं कुणी काढलं असेल असं वाटतंय तुम्हाला ?
माहित नाही म्हणताय. सांगतो.
अक्कलरावांच्या शेजारी एक जयुराणी राहते. हो ! हो ! तोच तो राजा. जयुराणी हे त्याचं लाडाच नाव. खरं नाव जयेश. तर चित्रकला हा त्याचा खूप आवडता विषय. असं असला तरी पठ्ठ्या वर्षभरात कधीही चित्रकलेची वही आणि रंग हाती घ्यायचा नाही. वर्ष संपता संपता चित्रकलेचे शिक्षक चित्रकलेची वही पूर्ण करायचा आग्रह करायचे. जयुराणीला आलेलं टेन्शन. वार्षिक परीक्षा तोंडावर आलेली आणि अशात अभ्यास सोडून चित्रकलेची वही पूर्ण करत कसं बसायचा ? बरं चित्रं तरी किती काढायची ! एक दोन नव्हे…………… चक्कं वीसहून अधिक. चित्रांचे विषयसुद्धा असेच पेचात पाडणारे . रक्षाबंधन, बस थांबा, पावसाळ्यातील एक दिवस, स्वातंत्र्यदिन …………एकपेक्षा दुसरा कठीण .
जयुराणी गेली बाबांकडे. सारं काही बाबांना सांगितल आणि म्हणाली, " बाबा मला काही चित्रं काढून द्या ना .”
जयुराणीच्या बाबांनाही चित्रं काढायला आवडायचं. त्यांनी लगेच एक दोन दिवसात जयुराणीला काही चित्रं काढून दिली. त्यातलंच एक ' पावसाळ्याच्या दिवसातलं चित्रं.'
झालं. चित्रकलेची वही पूर्ण झाली. जयुराणीनं ती त्याच्या शिक्षकांना दाखवली. आणि ' पावसाळ्याच्या दिवसातल ' ते चित्रं पाहताच सर म्हणाले, "हे चित्रं तू काढलस ?”
“नाही सर. हे चित्रं माझ्या बाबांनी काढलंय." सरांनी त्या चित्राला दहा पैकी सात मार्क दिले .
जयुराणीनं घरी आल्यावर बाबांना हे सारं सांगितलं. खरं बोलल्याबद्दल बाबांनी जयुराणीला शाब्बासकी दिली. पण जयुराणीसमोर प्रश्नचिन्ह. त्याची शंका. त्यानं बाबांना विचारली, “ पण बाबा सरांनी तुम्ही एवढ छान काढलेल्या चित्राला सातच मार्क का दिले ?”
“हे बघ बेटा. खरं तर सरांनी त्या चित्राला शून्याच मार्क द्यायला हवे होते. पण त्यांनी सात मार्क दिले ते चित्राला नव्हे तर तुझ्या खरेपणाला .” बाबांनी जयुराणीला समजावून सांगितलं.
“पण एक लक्षात ढेव, यापुढे असं कधीच करायचं नाही. तुझं काम तूच करायचं .”
जयुराणीनं बाबांना पुन्हा असं न करण्याचं वचन दिलंय. आणि तुम्हीसुद्धा असं कधीच वागणार नाही याची मला खात्री आहे. चित्रं काढायला जमत नसतील तर उन्हात खेळण्या ऐवजी थोडी चित्रं काढण्याचा सराव करा.
No comments:
Post a Comment