Sunday, December 12, 2010
आय अम अ डिस्को डान्सर
माझं गाव ओढ्या वघळीतलं. पावसाळ्यात तुडूंब भरून वाहणारं.............उन्हाळ्यात डोहाडोहातून साचणार.
वस्तीवरची शाळा चवथीपर्यंत. त्यापुढं शिकायचं असेल तर कमीत कमी तीन किलोमीटर चालत जायला हवं आणि शाळा सुटल्यानंतर पुन्हा तेवढच चालत यायला हवं. उन्हाळ्यात पायात चपला असतीलच याची खात्री नाहीच पण हिवाळ्यात स्वेटरही मिळणार नाही. उन्हाळ्यात फुफाट्यातले चटके सोसत आणि हिवाळ्यात थंडीत कुडकुडत शाळेत जायला हवं. असाच कधीकाळी मी तिथल्या शाळेत गेलो आहे.
त्यामुळंच गावी गेल्यानंतर अनवाणी पायपीट करत शाळेत जाणारी एवढी एवढीशी मुलं मुली पहिली कि ' सर्व शिक्षा अभियान ' च्या जाहिरातीतल्या ' स्कूल चले हम .......... ' असं म्हणत आनंदानं बागडणाऱ्या मुलांच चित्रं माझ्या डोळ्यासमोर उभं रहातं ..........आणि शहरातली दारादरात येणाऱ्या स्कूल बसमध्ये बसून शाळेत जाणारी तुम्ही मुलं किती नशीबवान असं वाटू लागतं.
असो!!!!!!!
तर परवा दिवाळीच्या सुट्टीत मी गावी गेलो होतो. सोबत भाऊही होता. त्याची दोन आणि माझी दोन मुलं, आई असे सारे सोबत.
संध्याकाळी शेतातून वस्तीवरच्या घराकडे जायला निघालो. माझे दोन तीन चुलत भाऊ रानातच घर बांधून शेताच्या कडेलाच रहातात. माझी आई चुलतभावाच्या छोट्या मुलाला म्हणाली, " तात्या, चल रे आमच्या सोबत. रहा आजची रात्र आमच्या बरोबर. सकाळी उठून येऊ परत रानात. "
तो तिसरीतला पोरगा. अश्या तश्या कपड्यातला ( म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलाचे असतात तसे कपडे हं ), डोक्याचा चमन केलेला. निघाला आमच्या सोबत. पायात पायताणही नाही माझ्या नव्याकोऱ्या गाडीत्नच घरी जायचं होतं. त्याला त्याचंही अप्रूप .
आम्ही घरी पोहोचलो.
रात्री गच्च काळोखातही मिणमिणणारा माझं गाव. अंगणात अंथरून टाकून आभाळाखाली चांदण्यात न्हात आम्ही निवांत बसलेलो. मुलांची दंगा मस्ती चाललेली. माझ्या आणि भावाच्या बायकोचा आत चुलीवर स्वयंपाक चाललेला. आई आमच्यातच बसलेली. सुखाला कुरवाळत. ती म्हणाली, " तात्याला छान गाणी येतात हं. "
मी तर शब्दांचा दास. आईचा शब्द उचलून धरत मीही त्याला आग्रह केला.
झालं !!!!! लगेच ते पोरगं गाणं म्हणू लागल. ते मला इतकं आवडल कि मी लगेच ते माझ्या मोबाईलवर रेकोर्ड करून घेतलं. ते गाणं तुमच्या समोर मांडावस वाटलं. म्हणून हा सारा उपद्व्याप.
तुम्ही शहरातली पोरं ' हम्पी .......डम्पि ' शिकता ........आणि गावाकडची पोरं ..........!!!!!!!!!!
कोकणात बारा मैलांवर भाषा बदलते असं म्हणतात. शिक्षणसुद्धा असंच गावागणिक बदलत असावं असं मला वाटलं. हे सारं राहू द्या. ते गाणं तर पहा............
Sunday, August 22, 2010
देवबाप्पा, देवबाप्पा
असं म्हणायचं असतं म्हणून नाही म्हणत काही. खरंच मला खूप वाईट वाटतंय तुम्हाला इतक्या दिवसांनी भेटतोय म्हणून. पण काय करणार मित्रांनो ? खूप काम असतं. शिवाय तुमची जशी शाळा सुरु झालीय ना तशीच आमच्या जयुरानीची आणि आदुदादाची शाळाही सुरु झालीय.
संध्याकाळी घरी आल्यानंतर तुम्ही अभ्यास करता ना. तसाच त्यांचाही अभ्यास सुरु असतो. मग मला काही कॉम्पुटरवर बसता येत नाही आणि तुमच्यासाठी नवीन काही लिहिता येत नाही.
पण तुमची आठवण येतच असते हं !
मला माहिती आहे शाळा संपली कि सुट्टी लागते. तुम्हाला खूप आनंद होतो. नुसत्या उनाडक्या करत फिरता तुम्ही. दोन महिने आई - बाबा, आज्जी - आजोबा, मामा - मामी साऱ्या साऱ्यांना नकोशे वाटत तुम्ही. कधी एकदा ही कार्टी शाळेत जातील आणि घर शांत होईल असं वाटत असतं त्यांना.
पण तुमचं मन कुठं कळतं त्यांना ? खरंतर तुम्हालाही सुट्टीचा कंटाळाच आलेला असतो. आणि तुम्हालाही कधी एकदा शाळा सुरु होते आणि कधी एकदा नवा गणवेष, नवी वह्या पुस्तक घेऊन शाळेत जातो आणि आपल्या मित्र - मैत्रिणींना सुटीतल्या गंमती जंमती सांगतो असं होऊन गेलेलं असतं.
झालं!!!!!!!!!!!!!
सुट्टी संपते. शाळा सुरु होते. पण महिन्या दोन महिन्यातच तुम्हाला पुन्हा शाळेचा कंटाळा येऊ लागतो. वाटतं, काय हे ? रोज तेच तेच. शाळा, शिकवणी, अभ्यास, इतिहास, भूगोल अगदी चक्रावून जाता तुम्ही.
अशाच तुमच्या एका मैत्रिणीलाही शाळेचा खूप खूप कंटाळा आलाय. तिला वाटत आपल्यापेक्षा देवाचं आयुष्य खूप मजेचं आहे. शाळा नाही, पाटी नाही, अभ्यास नाही, शिकवणी नाही कि संध्याकाळी शुभंकरोतीही म्हणायची नाही. ही सगळी शोकांतिका देवालाच सांगताना ती म्हणते -
वरच्या चित्रवरती टिचकी मारा. मग तुम्हाला ही कविता आणखी मोठ्ठी करून पहाता येईल.
कशी वाटली कविता ? ते न विसरता कळवा.
पण ही कविता म्हणजे आपली गंमत बरं. शाळेत जायला हवाच खरं.
नुसत शाळेत जाऊनही नाही भागायचं. अभ्यासही करायला हवा. कराल ना अभ्यास. सगळेच हो म्हणताय.
चला तर मग बाय.
तुम्ही खूप मन लावून अभ्यास केलात कि मग मीही तुम्हाला एक वचन देईन. चार आठ दिवसातून भेटण्याचं. तुमच्यासाठी काहीतरी लिहित राहण्याचं.
Sunday, August 1, 2010
मैत्री दिन अर्थात फ्रेन्डशिप डे
गुरुजींनी, अभ्यास का नाही केला ? असं विचारलं तर तुम्ही बऱ्याचदा अनेक कारणं सांगता कधी खरी..........कधी खोटी. पण मी नाही तुम्हाला अशी काही कारणं सांगत बसणार. मी खूप दिवसानंतर तुम्हाला भेटतो आहे. आणि तुम्हाला भेटण्यासाठी मी खूप खूप उशीर केला म्हणून तुम्ही द्याल ती शिक्षा मला मान्य आहे.
अगदी आजही तुम्हाला भेटणं शक्य नव्हतं. पण आज मैत्री दिवस. आणि तुम्ही माझे जीवाभावाचे मित्र मग तुम्हाला भेटल्याशिवाय आणि गोड गोड शुभेछा दिल्याशिवाय मला झोप कशी येईल ?
जाता जाता आपल्या मैत्रीसाठी या ओळी -
तुमचा
अक्कलराव
Tuesday, July 6, 2010
एक होता पाऊस
Sunday, June 27, 2010
एक होतं वांग
वांगी घ्यावीत अंगावर निळसर झाक आणि पांढरे ठिपके असलेली.
मुलांनो वांग्याची भाजी आपल्या जेवणात असणा आपल्या शरीरासाठीही खूप खूप आवश्यक आहे. कारण त्यातून आपल्याला पोट्याशिअम आणि रक्त वाढीसाठी आवश्यक असणारी आयर्न हे खनिजही मिळतं. तर ' बी ' आणि ' सी ' यासारखी जीवनसत्वही वांग्यात असतात. त्यात ज्यांच्यामुळे आपल्या शरीरात चरबी वाढते असे फ्याटही नसतात.
इतकंच नव्हे तर ते आपल्या रक्त वाहिन्यात क्लोरेस्टोल जमा होऊ देत नाही. सहाजिकच आपल्या र्ह्दय विकरासारख्या रोग पासून दूर ठेवतं कॉन्सर सारख्या दुर्धर रोगाला दूर ठेवायलाही वांग मदत करतं.
या कवितेतलं वांग आपल्याविषयी तक्रार करत असलं तरी त्याला आपल्या पोटात जायला आणि आपल्याला ताकद द्यायला आवडता हं !
तरी हे वांग गमतीनं काय म्हणत पहा –
एक होतं वांग
स्वतः मध्ये दंग
शेत सोडून निघालं
बाजार गेलं
भाजीवाल्यानं विकून
ते सुमाताईंना दिलं
केल त्याचं भरीत
वांग म्हणालं, " पाहुणचाराची
ही काय रीत ? "
भाजून काढलं मला
मीठ मिरची टाकून म्हणे,
" छान बेत झाला."
Tuesday, June 22, 2010
राक्षस गेला शाळेमध्ये
तुम्हाला माहिती आहे का कि काल आमच्या राक्षसपुरचा राक्षससुद्धा शाळेत गेला होता. खोटं नाही सांगत आहे. खरंच, अगदी देवाशप्पत.
कशाला म्हणून काय विचारताय ?
तुम्ही कशाला जाता शाळेत ?
बरोबर ! शिकून मोठ्ठ व्हायला. हो कि नाही.
आमच्या राक्षसरावांना म्हणे बाराखडी आणि अंकलिपी शिकायची होती.
तुम्हाला वाटलं असेल एवढा मोठ्ठा धिप्पाड राक्षस शाळेत गेला म्हणजे शाळेचं दार तोडाव लागलं असेल. छप्पर काढव लागलं असेल. पण नाही हा मुलांनो तसं काही करावं लागलं नाही. ज्या दरवाजातून मुलं वर्गात गेली त्याच दरवाजातून राक्षसरावही वर्गात गेले. आतमध्ये जाताना इतके वाकले कि चक्क आजोबा झाले. वर्गात येवून उभं राहू गेले तर धाडदिशी छप्पर डोक्याला लागलं. बाकावर बसले असते तर, बाकाचा पार भुगा झाला असता. म्हणून त्यांनी चक्क जमिनीवरच बसकन मारली. ऐसपैस बसले.
गुरुजी वर्गात आले. त्यांची आपली नेहमीची नाकासमोर पहायची आणि बेंचवर बसलेय मुलांवरून नजर फिरवायची सवय. सहाजिकच त्यांचं समोर बसलेल्या राक्षसरावांकडे लक्षच गेलं नाही. मग राक्षसरावांनीच गुरुजींना शिकविण्या विषयी विनंती केली आणि काय गंमत झाली पहा -
एकदा एक राक्षस
शाळेमध्ये गेला
गुरुजींसमोर बसून म्हणाला
शिकवा आता मला
पुढची कविता खालच्या चित्रात संपूर्ण वाचा -
Sunday, June 20, 2010
आज ' बाबा दिन '
Saturday, June 19, 2010
पाटी तेवढी खरी वाटते
ठीक आहे.
हा तर मग आता सांगा तुमच्या शाळेचा पहिला दिवस कसा गेला ?
मजेत गेला असेल ना ?
नवे कपडे..........नवे बूट. नवं दफ्तर.........नव्या वह्या...............नवी पुस्तकं. सारं सारं......नवं कोरं.
मुलांनो या नव्या वह्या पुस्तकांचा कधी वास घेऊन पाहिलात ?
पहिल्या पावसानंतर येणारा मातीचा वास आणि नव्या पुस्तकांचा वास दोन्हीही खूप छान असतात. ते तयार करता येत नाही. पण जेव्हा येतात तेव्हा श्वासात भरून घ्यावेसे वाटतात.
काही काही गोष्टी अती झाल्या कि त्यांचा कंटाळा येतो. सुट्टीचही तसंच असतं. मला माहिती आहे तुम्हालाही सुट्टीचा कंटाळा आला असेल. कारण या पुढच्या कवितेतल्या छोट्यालाही सुट्टीचा कंटाळा आलाय म्हणूनच तो म्हणतोय -
आता झाली सुट्टी पुरे
शाळा मला खरी वाटते
टि. व्ही. नको गेम नको
पाटी तेवढी खरी वाटते
तो छोटू आणखी काय काय म्हणतोय ते ही पहा -
Monday, June 14, 2010
अक्कलरावांच्या जागतिक दौऱ्याचा अहवाल
उलट मला मात्र रोज तुमची आठवण होत होती. म्हणूनच मध्ये मी जगभर विमान प्रवास करण्यासाठी निघालो तेव्हा विमानात झालेल्या गंमती जंमती आणि एअर होस्टेस जवळ आम्ही व्यक्त केलेलं आमच्या जगभरच्या दौऱ्याच प्रयोजन आम्ही तुम्हाला विजयरावांच्या मार्फत मी तुम्हाला सांगितल. त्याच्या पुढची हि गंमत.
मुलांनो मी असं सारं जग फिरून आलो. पण आपल्या इथल्या मंत्रीमंडळांचे जागतिक दौरे जसे नेहमीच अयशस्वी ठरतात तसाच माझा जागतिक दौराही अयशस्वी ठरला.
मी जगभर फिरून आल्यानंतर माझ्या दौऱ्याचा एक अहवाल तयार केलाय. तो अहवाल पुढीलप्रमाणे -
" आपल्या इथले कावळे, " काव - काव " आणि चिमण्या, " चिव - चिव " याची जगाच्या दौर्यावर जाताना मी नोंद केली होती. आफ्रिकेत पोहोचल्यावर तिथल्या कावळ्यांच्या आणि चिमण्यांच्या आवाजाची नोंद करण्याचा मी प्रयत्न केला. पण तिथले कावळेही काव - कावच करतात आणि चिमण्याही चिव चिव करत त्यांना दाद देतात.
मला वाटला होतं अमेरिकेतल्या कावळ्यांचा रंग आपल्या इथल्या कावळ्यांच्या तुलनेत असेल गोरा. अहो पण कसचं काय तिथल्या कावळ्यांपेक्षा आपल्या इथल्या कावळ्यांचाच रंग बरा.
खर तर मला जगभरच्या प्रवासात ठिकठिकाणच्या मिसळचा.......वडापावचा.........इडलीसांबरचा......स्वाद चाखायचा होता. पण छे ! सारं जग फिरून आल्या नंतर मला कळलं हे सारं फक्त आपल्या भारतातच मिळतं. काही ठिकाणी मिळतही असं काही पण त्याला आपल्या इथल्या सारखी चटकदार चव नाही. सहाजिकच माझी खूप उपासमार झाली. त्यामुळेच यापुढे कोणत्याही कारणासाठी प्रदेश दौरा करायचा नाही असं मी ठरवून टाकलंय. "
तुमचा ...........
अक्कलराव
मित्रांनो आणखी एक गोष्ट अक्कलरावांनी तुम्हाला सांगितलीच नाही. ती मी सांगतो. अंटार्तिकात गेल्यावर अक्कलरावांना तिथली बर्फाची गाडी खूप आवडली. साहजिकच त्यांनी विमान तिथच सोडून दिलं आणि तिथल्या बर्फाच्या गाडीत बसून ते परतीच्या प्रवासाला निघाले. पण विषवृत्त ओलांडताना त्यांची बर्फाची गाडी वितळून गेली आणि अक्कलरावांना मजल दरमजल करत पुढचा प्रवास करावा लागला.
अन्यथा आज अक्कलराव आपल्या पुण्यातल्या रस्त्यातून बर्फाच्या गाडीत बसून फिरताना आपल्याला दिसले असते.
.तुमचा ............
छे ! मी माझं नाव तुम्हाला सांगणार नाही. मी तुम्हाला हि अक्कलरावांची फजिती सांगितली हे अक्कलरावांना कळाल तर ते माझ्यावर रागवतील ना !
Saturday, June 5, 2010
५ जून. जागतिक पर्यावरण दिन.
मागे एकदा मी " जागतिक चिमणी दिना " विषयी
लिहिला होतं.
आठवतोय तुम्हाला तो दिवस ?
बरोबर. २० मार्च.
तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं कि चिमण्यांसाठी आपण आपल्या अवती भोवती धान्य पेरायला हवं. त्यामुळे चिमण्यांची संख्या वाढेल. पण चिमण्या हा एक घटक आहे पर्यावरणाचा.
आपल्या बेताल वागण्यामुळे चिमण्या प्रमाणेच इतरही अनेक सजीव नामशेष होऊ लागले आहेत. हे सजीव कधीही आपल्यावर अवलंबून नव्हते. आपणच त्यांच्या आधारे जगत आलो. पहाता पहाता प्रगत झालोत. पण आपली प्रगतीच आपल्याला एक दिवस मारक ठरणार आहे. कारण आपली प्रगती साधता साधता आपण करतो आहोत निसर्गाचा विध्वंस. पण हे थांबायला हवं असं आता साऱ्या जगाला वाटू लागलाय. म्हणून सारं जग पर्यावरण सुदृढ व्हावं यासाठी एक दिवस साजरा करतं. तो दिवस म्हणजे आजचा दिवस -
५ जून. जागतिक पर्यावरण दिन.
वरच्या चित्रातली मुलं पहिलीत. झाड त्यांच्या कानात एक गोष्ट सांगतंय. ती गोष्ट मी तुम्हाला नंतर सांगिन.
आत्ताच हवी.
नाही रे बाळांनो. नंतर नक्की सांगिन.
हो हो मला माहिती आहे मी तुम्हाला मागे खूप वचनं दिली आहेत. तुम्हाला ते पावसाचं गाणं ऐकवायचं आहे. खूप गोष्टी सांगायच्या आहेत. पण थोडा धीर धरा. वेळ मिळेल तसं सारं सांगणार आहे.
आज आपण फक्त जागतिक पर्यावरण दिनाविषयी बोलू.
मित्रांनो आपण एवढी वृक्षतोड केली आहे कि काही दिवसांनी आपल्याला श्वास घेणंही अवघड होणार आहे.
झाड काय काय करतात माहिती आहे तुम्हाला ?
बरोबर ते आपल्याला ऑक्सिजन देतात. त्यालाच आपण प्राणवायू म्हणतो.
आणखी ?
अगदी बरोबर. ती आपल्याला सावली देतात, आपल्या घरासाठी लाकूड देतात, वय झाला कि स्वतःला चुली मध्ये जाळून घेतात.
पण या बरोबरच झाडा जेव्हा आपल्याला ऑक्सिजन देतात तेव्हा ती हवेतला कार्बनडाय ऑक्साइड हा वायू शोषून घेतात. हा वायू ते त्यांच्या बुंध्यात साठवून ठेवतात. जेव्हा हा बुंधा जाळला जातो तेव्हा हा सारा कार्बनडाय ऑक्साइड पुन्हा हवेत मिसळला जातो. म्हणून झाड तोडू तर नयेच पण तोडल्यानंतर जाळू तर मुळीच नये.
मित्रहो अक्कलराव झाडं लावायचं काम करतात. तुम्ही जाल का त्यांच्यासोबत ?
जाल म्हणताय. तुम्ही खरच खूप शहाणी मुलं आहात.
आणि नाही जमला तुम्हाला अक्कलरावांच्या बरोबर जायला तरी हरकत नाही. या पावसाळ्यात तुम्ही प्रत्येकानं एक झाड लावा. त्याला रोज पाणी घाला. त्याला छोटी छोटी तांबूस हिरवी पानं येतील ना मग पहा तुम्हाला किती छान वाटेल. ते झाड नव्हे तुमचंच इवलसं रूप वाटेल तुम्हाला.
तुम्ही एवढ केलंत ना कि मग आजचा दिवस खऱ्या अर्थाने सार्थकी लागल्यासारखा वाटेल मला.
तुमचा अक्कलराव
Thursday, June 3, 2010
अक्कलरावांचा विमानप्रवास
अक्कलरावांच्या खूप गमती जमती तुम्हाला इथं पाहायला, वाचायला मिळतील. अक्कलरावांच्या धमाल गोष्टीही वाचता येतील. कारण स्वर्गातले नारदमुनी आणि भूतलावरचे अक्कलराव दोघांची कुंडली एकंच. दोघांनाही कोणत्याही लोकी कधीही प्रवेश घेता येतो. अक्कलराव असे केव्हाही, कुठेही प्रवेश करू शकत असल्यामुळे ते केव्हाही कुठेही जातात आणि मजा करतात. ते स्वर्गात जातात, समुद्रात जातात, पऱ्यांच्या प्रदेशात जातात, राक्षसाच्या गुहेत शिरतात आणि धमाल करतात.
अगदी परवाचाच उदाहरण घ्या ना. तुम्हाला सुट्टी लागली म्हणून तुम्ही गावो गावी निघून घेलात. कुणी नुस्ते खेळण्यात रमले. सगळे विसरले अक्कलरावांना. साहजिकच अक्कलरावांनाही कंटाळा आला. मग तेही निघाले फिरायला. पण कुठे जायचं फिरायला ?
विचार करता करता अक्कलरावांनी चक्क जगभर फिरून यायचं ठरवलं. आता जगभर फिरायचं म्हणल्यावर बैलगाडीतून प्रवास करून थोडंच चालणार आहे. सहाजिकच अक्कलरावांनी विमानान प्रवास करायचं ठरवलं. मग अक्कलरावांनी पासपोर्ट काढला, व्हिसा काढला. आणि एक दिवस आपलं चंबू गबाळ घेवून पोहचले विमानतळावर.
थोड्याच वेळात त्यांचं विमान प्ल्याट फॉर्मला लागलं. रेल्वेच्या नाही काही विमानाच्या प्ल्याट फॉर्मला. हो बरोबर सांगितलत तुम्ही " धावपट्टी " म्हणतात त्या प्ल्याट फॉर्मला.
झालं अक्कल राव विमानात बसले. विमानाचं दार लागलं. सूऊऊउ करून विमान हवेत झेपावलं.
अक्कलराव त्यांच्या खुर्चीत रेलले. विमानाच्या खिडकीतून बाहेर डोकावून पाहू लागले. एवढ्यात एअर होस्टेस आली आणि मग काय काय गंमत झाली पहा बरं. अक्कलरावांना जगभर कशासाठी फिरायचं आहे तेही अक्कलराव एअर होस्टेसला सांगतात.ते ही फरा मजेशीर आहे. हे सारा वाचा या कवितेत -
Saturday, May 29, 2010
जग किती देखण
खूप दिवस झालं नाही तुम्हाला भेटलो नाही.
नाही, मी तुम्हाला विसरलो नव्हतो काही. खूप अडचणी होत्या. कायये माहिती आहे का ? जसं इथ मी तुमच्यासाठी लिहितो ना तसच दुसऱ्या एका ठिकाणी तुमच्या मोठ्ठ्या ताई आणि दादासाठी लिहितो. त्या ठिकाणी लिहिताना काही अडचणी आल्या होत्या. त्यातून मार्ग काढता काढता हे असं तुमच्या माझ्या भेटीमध्ये बारा पंधरा दिवसांचं अंतर पडलं. दहा दिवस गेले माझे त्या अडचणीतून मार्ग काढताना. मला मार्ग सापडला तेव्हा मी सुटकेचा श्वास घेतला.
झालतं काय ! तुमच्यासाठी जशी मी काही चित्र टाकतोना इथं तशीच त्यांच्यासाठीही काही चित्र टाकतो. अचानक ती चित्र दिसायाचच बंद झालं होतं.
आणि ही अफ्रिकेतली लिम्पापो नदी. तुम्हाला माहिती आहे लिम्पापो म्हणजे पाण्यातली मगर. या नदिमधे आशा खुप मगरी आहेत म्हणून या नदीचा नाव लिम्पापो.
हा कोण माहितीच आहे तुम्हाला ! पेग्विन
वाळवंट ! किती अगम्य ?
वाळूचा कागद .........वाळूचा ब्रश ..........असं चित्र पाहताना कोण होणार नाही वश !
Saturday, May 15, 2010
आईचं बाळ
बाळ तुझं लाडोबा
आपण आईच्या कुशीतून जन्म घेतो. हे नजरेत न मावणारं जग लुक लुक डोळ्यांनी पाहत राहतो. आई खूप खूप प्रेम करत असते आपल्यावर. तिच्या मांडीवर खेळायचं, तिच्या हातानं भरवून घ्यायचं, तिच्या कुशीत निजायचं, तिचं बोट धरून पाहिलं पाउल टाकायचं. पाटी नाही, पुस्तक नाही. शाळा नाही, खेळ नाही. सारखं आपलं तिच्या अवतीभवती भिरभिरत रहायचं. ती सुद्धा आपली आठवण आली कि मधेच वेळ काढणार. कधी येवून आपली पापी घेणार. कधी हळूच आपल्या गुबगुबीत गालाच्या पाकळ्या ओढणार. कधी कधी तिला आपल्यावर माया करायचं इतकं भरतं येत कि ती सारं काम आहे तसंच टाकून देते आणि पटकन येवून आपल्याला पदराखाली घेते. आपणही मग मजेत कृष्ण होवून ते अमृतपान करत राहतो.
अशी दोन चार वर्ष सुखात जातात. कुणास ठावूक कुठून पण घरात पुन्हा एक छोटसं बाळ येतं. आपल्याहूनही छोटसं. गोरंगोरंपान, इवल्या इवल्या मुठी असणार, फुल उमलाव तसं खुदकन हसणारं. मस्त वाटत आपल्याला सुरवातीला. त्याच्याशी खेळताना, त्याची पापी घेताना, त्याच्याशी बोबडं बोलताना खूप खूप आनंद होतो. आपण त्याची मोठ्ठी ताई आहोत म्हणून अभिमानही वाटतो.
कधी कधी त्याचं काय बिनसतं कुणास ठावूक. खुदकन हसायचं सोडून ते मधेच सप्तसूर लावतं. मग आपण रागावतोही त्याला. ते आणखीनच गळा काढत.
आपण त्याला असे रागावतो. आणि आई स्वयंपाक घरातून येवू धपक्कन पाठीत एक धपाटा ठेवून देते आपल्या. खरंतर खूप जोरात मारलेलं नसतं आईनं आपल्याला. पण तरी आपण सूर काढून रडायला लागतो. डोळे भरून येतात. आभाळासारखे बरसू लागतात. आपण असे कुण्णी कुण्णी नसल्यासारखे रडत असताना आई आपल्याला जवळही घेत नाही. उलट त्या इटुकल्या पिटुकल्यालाच पदराखाली घेते. झालं हिरोचा सूर लगेच बंद. आपण मात्र रडतोच आहोत कोपऱ्यात बसून.
आईचं हे असं वागणं पाहून, " आई मी मोठ्ठी झाले म्हणून माझं काही चुकलं का गं ? अगं छोट्या बाळाला जशी तुझ्या मायेची गरज आहे तशी मला सुद्धा तुझ्या मायेची खूप गरज असते गं. तेव्हा तू बाळाचे लाड कर पण कधी कधी माझेही थोडे लाड करत जा ना." अशी आईला लाडी गोडी लावणारी हि मुलगी.
Tuesday, May 11, 2010
राक्षसपूरचा राक्षस
आवडेल म्हणताय ! खूप छान.
मित्रांनो तुम्ही जसे मित्र आहात ना अक्कलरावाचे तसेच आणखी खूप मित्र आहेत अक्कलरावाचे. परवा तुम्हाला भेटलेला झाडासाठी टोपी शिवण्याच स्वप्न पहाणारा छोटा मुलगा जसा मित्र आहे ना अक्कलरावाचा तसाच राक्षसपूर नावाच्या गावातील एक राक्षस हि मित्र आहे अक्कलरावाचा.
अरे ! असे घाबरू नका राक्षस म्हणालं कि लगेच. हा राक्षस काही गोष्टीतल्या नेहमीच्या राक्षससारखा आडदांड नाही. राक्षसपूरमधला हा राक्षस खूप प्रेमळ आहे. त्याच्या अंगावर केस नाहीत. डोक्यावर शिंग नाहीत. त्याचे डोळे आगीचे लाल गोळे नाहीत आणि त्याच्या तोंडात लांबलचक सुळेही नाहीत. त्याला गाडीभर खायला तर लागत नाहीच पण पाणी किती लागतं प्यायला तर फक्त चमचाभर. आहे कि नाही मजेशीर राक्षस .
हा राक्षस तुम्हाला त्याच्याजवळ असलेल्या चोकलेट मधलं अर्ध चोकलेट तर देतोच पण तुमची गोड पापीही घेतो.
तुम्हीही भेटा त्याला आणि त्यांनी पापी घेतली कि कसं वाटलं ते ही सांगा.
Sunday, May 9, 2010
मातृदिन. ९ मे
"काय म्हणालात. आम्हाला आमचा खेळ सोडून एवढ्या तातडीने का बोलावलत ?"
"सांगतो. सांगतो. आज काय आहे माहिती आहे का तुम्हाला ?"
" नाही ना ? सहाजिकच आहे. लहान आहात तुम्ही अजून. पण तरही हे तुम्हाला माहिती असलंच पाहिजे. कारण तो एक आपल्या संस्काराचा भाग आहे. म्हणून तर तुम्हाला एवढ्या तातडीने बोलावलंय."
"हं ! तर मुलानो आज आहे मातृदिन. ९ मे . लक्षात ठेवाल ना यापुढे ! "
" काय म्हणालात ? मातृदिन म्हणजे काय असतं ?"
"मुलांनो. मातृदिन म्हणजे आईची थोरवी गाण्याचा दिवस. आईच्या मोठेपणाच स्मरण करण्याचा दिवस. आई आपल्यासाठी राबते. झिजते. हाडाची काड करते. पण आपण कधी तिचे आभार सुद्धा मानत नाही. तिच्यावर कधी सुखाचे चार शब्द उधळत नाही. जगभरातल्या प्रत्येक मुलांना आपल्या आईविषयी कृतन्यता व्यक्त करावी म्हणून जगभरात आज हा दिवस साजरा केला
जातो. "
"म्हणजे काय करायच अक्कलराव ? असं अजिबात विचारू नका. "
"करायचं म्हणलं तर खूप काही करता येण्यासारखं आहे. खूप काही करू नका. फक्त आज आईला त्रास द्यायचा नाही. म्हणजे इतर दिवशी द्यायचा असं नव्हे. पण आज मात्र तिला थोडाही त्रास द्यायचा नाही. तिच्याजवळ कुठलाही हट्ट करायचा नाही. तिनं सांगितलेलं प्रत्येक काम ऐकायचं आणि तिची गोड पापी घेवून तिचं असंच अखंड प्रेम लाभावं म्हणून देवाजवळ प्रार्थना करायची."
"मुलांनो आईच्या वेदना, तिचे कष्ट, तिचं सोसणं, तिनं आपल्यासाठी केलेली धडपड यापैकी कश्शा कश्शाची जाणीव नसते आपल्याला. या साऱ्याची जाणीव ठेवण्याचा हा दिवस."
"आई जशी आपल्याला असते तशीच पाखरांना असते........वासरांना असते. वाघाच्या बछडयाला असते आणि गाढवाच्या गाधडयालाही असते."
"आकाशातून आपल्या पिलांवर झडप घालणाऱ्या बलाढ्य घारीवर कोंबडीसारखा सामान्य जीव धावून जातो. कारण ती आई असते. बस्स ! एवढंच लक्षात ठेवा आणि यापुढे आईला त्रास देणं बंद करा ."
"कराल ना एवढ ?"
"सगळेच हो म्हणाले. चला ! मला आजचा दिवस सार्थकी लागल्यासारखा वाटतो आहे. अरे पण असे पळताय कुठे सगळे ?"
"आईच्या कुशीत शिरायला ? ठीक आहे. ठीक आहे. चला मी हि निघालो माझ्या आईच्या कुशीत शिरायला."
Friday, May 7, 2010
चित्र आणि खरेपणा
चित्र काढायला आवडतं ना तुम्हाला ?